एसटी डेपो बाहेर नेल्याने चालकाला मारहाण – चालकाने वाहतूक नियत्रंकाच्या डोक्यात घातला दगड
प्रतिनिधी/ सातारा
सातारा आगारातून एसटी बस आगाराबाहेर नेणारा चालक व एसटी कर्मचाऱयामध्ये सोमवारी रात्रीपासून वादावादी सुरू झाली. या वादावादीला मंगळवारी हिंसक वळण मिळाले. या चालकाने शहर पोलीस ठाण्यात मारहाण झाल्याची तक्रार दाखल केली. मात्र, त्याच चालकाने वाहतूक नियंत्रकांच्या डोक्यात दगड घालून त्यांना जखमी केले असून त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सूरू आहेत. यामुळे साताऱयातील एसटी कर्मचाऱयांच्या संपात दुफळी निर्माण झाल्याने संपाच्या नवव्या दिवशी आंदोलनाला हिंसक वळण लागले.
राज्यभर सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱयांचा संप मागे घेण्यासाठी राज्यसरकार प्रयत्न करत आहे. तर एसटीचे विलीनिकरण राज्य शासनात झाले पाहिजे. या मागणीवर कर्मचारी ठाम आहेत. जोपर्यंत ही मागणी पूर्ण होत नाही. तोपर्यंत संप मागे घेणार नसल्याचे कर्मचाऱयांकडून सांगण्यात येत आहे. या संपाला संपूर्ण महाराष्ट्रातून एसटी कर्मचाऱयांनी पाठिंबा दिला आहे. परंतु हा संप मोडून काढण्यासाठी सरकार दबाव तंत्र निर्माण करत आहे.
काही डेपोतून रिकाम्या एसटी बस सोडण्यात येत आहे. अशीच घटना सोमवारी सातारा आगारात घडली. सोमवारी 4.30 वाजण्याच्या सुमारास खासगी शिवशाही बस घेवून चालक राजेंद्र बाबुराव पवार (वय 53) हे स्वारगेटला गेले. या शिवशाही बसमध्ये एकही प्रवाशी नव्हता. बस डेपोबाहेर पडताना तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे पोलिसांनी सातारा आगारात तळ ठोकला होता. ही शिवशाही बस घेवून चालक पवार रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास पुन्हा सातारा डेपोत आले. यावेळी याच आगारातील चालक विक्रम अशोक जगंम (रा. मांडवे) व चालक पवार यांच्यात वादावादी झाली. या वादावादीत जंगम यांनी पवार यांच्या कानाखाली मारत तू एसटी बस डेपोबाहेर का नेलीस? अशी विचारणा केली. तुला बघून घेतो अशी धमकी पवार यांनी दिली. त्यानंतर या मारहाणीबद्दल चालक पवार यांनी मंगळवारी सातारा शहर पोलीस ठाण्यात चालक विक्रम जंगम यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला.
तर मंगळवारी वाहतूक नियंत्रक अमित चिकणे व संपातील कर्मचाऱयांनी यांनी चालक पवार याला शिवशाही बस पुण्याला का घेवून गेलास ? अशी विचारणा केली. यावेळी किरकोळ बाचाबाची झाली. या बाचाबाचीत राजेंद पवार यानी चिडून जावून वाहतूक नियत्रंक अमित चिकणे यांच्या डोक्यात दगड घातला. यामुळे चिकणे हे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले आहे. यामुळे सातारा आगारात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, पोलिसांनी वाहक पवार याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
एस. टी. कर्मचारी संप हिंसक वळणावर
राज्यभर व गेल्या 8 दिवसांपासून सातारा आगारात सुरू असलेला संप मिटवण्यासाठी सरकारचे प्रयत्नांना यश मिळत नाही. विलीनिकरण झाल्यास कर्मचाऱयाची पगार वाढ होणार असून इतर प्रश्नही सुटणार आहे. या एका मागणीसाठी सुरू झालेल्या संप दडपण्यासाठी प्रयत्न होत आहे. यामुळे एसटी बस आगाराबाहेर गेल्याने कर्मचाऱयामध्ये वाद सुरू होवून त्या वादाला हिंसक वळण मिळत आहे. साताऱयातील ही घटना एसटी संपाला हिंसक वळण मिळत असल्याचा पुरावा आहे.
जिल्हय़ात 17 ते 22 पर्यंत 144 कलम लागू
त्रिपुरा राज्यातील घटनेच्या पार्श्वभूमीवर पाच किंवा पाचपेक्षा अधिक लोकांनी जमा करुन सभा घेणे, मोर्चा काढणे. धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी महाआरती, नमाज पठण तसेच इतर धार्मिक विधी करणे, एकत्र येवून घोषणाबाजी, जल्लोष याबाबी सार्वजनिक ठिकाणी करण्यास जिल्हा दंडाधिकाऱयांनी प्रतिबंध केला आहे. कोणीही व्यक्ती समाज माध्यमांचा वापर करुन जातीय तणाव निर्माण करणाऱया अफवा, आक्षेपार्ह संदेश पसरविणे. अशा प्रकारच्या अफवा, आक्षेपार्ह मजकुराचा संदेश पसरविणार नाही. याबाबत सर्वस्वी जबाबदारी ग्रुप ऍडमीनची राहील. कोणत्याही प्रकारचे जातीय तणाव निर्माण करणारे मजकुराचे देखावे तसेच फ्लेक्स बोर्ड लावणे त्या प्रकारच्या प्रक्षोभक घोषणा देणे, पत्रके वाटणे. समाज माध्यमामध्ये चुकीची माहिती, अफवा जाणीवपूर्वक प्रसारीत अथवा प्रकाशित करणे. इत्यादी गोष्टींस या आदेशान्वये मनाई करण्यात आली आहे.








