श्रद्धेच्या बहाण्याने अनेक विकृत्या, एका वकिलाचाही गुन्हय़ात सहभाग : साताऱयात खळबळ
प्रतिनिधी/ सातारा
धार्मिक श्रध्देचा गैरफायदा घेत महिलांची फसवणूक व पिळवणूक करणाऱया घटना घडतच असतात. साताऱयात देखील एका धर्माच्या प्रार्थना सभेच्या धर्मगुरु असलेल्या फादरने महिलेवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. यामध्ये एका वकिलाने देखील त्या महिलेच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत तिच्यावर अत्याचार केले असून दोघेही साताऱयातील रहिवासी आहेत. पीडित महिलेने शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर या घटनेचा पर्दाफाश झाला असून यामुळे साताऱयात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, साताऱयातील जंरडेश्वरनाका परिसरात राहणाऱया एका विवाहित महिलेला असलेला त्रास दूर करण्याच्या बहाण्याने ओळख वाढवून नंतर तिला, पती व मुलांना ठार मारण्याची धमकी देत शरीरसंबंध प्रस्थापित केले. यावेळी महिलेचे नग्न फोटो काढून ते सर्वांना दाखवण्याची धमकी देत 2007 ते 2020 या कालावधीत वारंवार महिलेवर अत्याचार करणाऱया एका प्रार्थना सभेचे धर्मगुरु फादर प्रमोद सदानंद लोंढे (रा. करंजे, सातारा) व ऍड. मंगेश चंद्रकांत पाटील (रा. दौलतनगर, सातारा) या दोघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात बलात्कार व ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेली महिती अशी, जरंडेश्वरनाका, सदरबझार परिसरात रहात असलेल्या पीडीत महिलेने तक्रार दिली असून तिच्यावर फादरने प्रार्थनेच्या माध्यमातून ब्लॅकमेल करत तर वकिलाने तिचे नग्न फोटो सर्वांना दाखवण्याची तसेच पती व मुलांना जीवे मारण्याची धमकी देत मारहाण, शिवीगाळ, दमदाटी करत तिच्या घरात तिच्यावर वारंवार अत्याचार आहेत. यामध्ये या दोन्ही नराधमांनी एमआयडीसीतील गोडावून रुम, सांगली येथील हॉटेल पैंजण, सैदापूर येथील हॉटेल राजदीप, सातारा डायग्नोस्टिक हॉस्पिटलमधील लेडीज बाथरुममध्ये महिलेच्या इच्छेविरुध्द बळजबरीने शरीरसंबंध केले आहेत.
दि. 26 जून 2019 रोजी तर जुलै रोजी पारंगे चौक येथे शिवथरे यांच्या चारचाकी गाडीत ऍड. मंगेश पाटील याने पीडित महिलेचा बुचडा धरुन तिला खाली वाकवून तिच्याशी विकृत, अनैसर्गिक चाळे करु लागला. तिने करण्यास नकार दिल्याने तिला जातीवाचक शिवीगाळ करुन तिच्यावर जबरदस्ती करत तिला खून करण्याची धमकी दिली. तसेच तिच्याकडून वेळावेळी एक लाख रुपये घेतले असल्याचे महिलेने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.
दरम्यान, एका चर्चच्या फादर्ससह वकिलावर अत्याचार व लैंगिक विकृतीसह ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्याने साताऱयात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फादर व वकिलावर गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्हय़ाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस अधिक्षक समीर शेख करत आहेत.
महिलेच्या तक्रारीनंतर फादर्सचा पर्दाफाश
2007 सालात संबंधित महिलेला त्यांच्या घरातील त्रास दूर करण्यासाठी देवाकडे प्रार्थना करतो म्हणून फादर प्रमोद लोंढे याने गोकूळ मंगल कार्यालयात बोलावले. त्यानंतर तिच्या घरी जावून प्रार्थना करण्याचे नाटक करत तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. तर 2008 सालात फादरने महिलेला कराड येथे प्रार्थनेला जायचे सांगत तिथून तिला सांगलीला नेले व तिथे तिच्या इच्छेविरुध्द जबरदस्तीने शरीरसंबंध केले. महिलेने त्याला जाब विचारला असता ही देवाची इच्छा असून मी देवमाणूस असल्याचे सांगितले.
मंगेश पाटीलनेही घेतला गैरफायदा
फादरच्या अत्याचाराचा पाढा महिलेने ऍड. मंगेश पाटील याला सांगितल्यानंर त्याने फादर लोंढेला धडा शिकवू म्हणत तिला हॉटेल राजदीपमध्ये घेवून गेला. तिथे थम्सअपमधून गुंगीचे औषध देवून तिच्यावर शरीर संबंध केले. त्याचे फोटो व व्हिडिओ शुटींगही काढून ठेवले. महिलेच्या पतीला वाढेफाटय़ावर मारहाण झाली होती त्याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हय़ात मदत करण्याचे सांगत महिलेच्या पतीचा विश्वास संपादन करुन तिच्या घरी येणेजाणे वाढवले होते. तिला वारंवार नग्न फोटो नातेवाईकांना पाठवण्याची धमकी देत तो देखील अत्याचार करत होता.
विकृतीचा गाठला कळस
मंगेश पाटील याने दि. 26 एप्रिल 2019 संबंधित महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यातून उपचार घेवून बरी झाल्यावर ती घरात असताना व तिला सलाईन लावलेले असताना चाकूचा धाक दाखवत शरीरसंबंध केले. संबंधास नकार दिला तर पाटील महिलेला पती व मुलांना जीवे मारण्याची धमकी देत होता. तर महिला तिचे रिपोर्ट आणण्यासाठी गेली असताना तिला चारचाकी गाडीत बसवून नेले. तिच्याकडून अनैसर्गिक कृत्याची मागणी करत पाटील याने तिला जातीवाचक शिवीगाळ करत खून करण्याची धमकी दिली असल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.








