प्रतिनिधी / सातारा :
पुणे जिल्ह्यातील चिखली येथे घराच्या बांधकामासाठी खोदकाम करताना सापडलेली 216 सोन्याची नाणी साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ठेवण्यात आली आहेत. संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी याबाबतची मााहिती दिली.
पुणे येथील पिंपरी चिंचवड भागातील चिखलीत घराचे बांधकामासाठी खोदकाम सुरु होते. त्यावेळी तेथे मजुराला एक तांब्याचा गढवा सापडला. त्या गढव्याचे वजन 526 ग्रॅम एवढे असून, त्यात 216 सोन्याची नाणी होती. त्या नाण्यांचे वजन 2 किलो 357 ग्रॅम एवढे आहे. ही नाणी सिराजउद्दीन मोहमंद बहादूर दुसरा याच्या काळातील असावीत, असा त्या नाण्यावर असलेल्या उर्दू अक्षरावरुन अंदाज बांधता येतो. पिंपरी-चिंचवडच्या गुन्हे शाखेने ती नाणी जप्त केली. त्यानंतर पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली साताऱ्याच्या संग्रहालयात ती सुपूर्द करण्यात आली.









