ले. जनरल मिलिंद भुरके, ले. जनरल प्रदीप सी नायर यांना अतिविशिष्ट सेवा मेडल आणि मेजर महेशकुमार भुरे यांना शौर्यचक्र प्रदान
सातारा / प्रतिनिधी :
सैनिक स्कूल सातारा येथील सेनेमध्ये महत्त्वाच्या पदांवर कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांना राष्ट्रपती भवनात संरक्षण मंत्रालयाच्या वतीने आयोजित केलेल्या ‘संरक्षण अलंकरण पुरस्कार 2020’ या सोहळ्यादरम्यान विविध बहुमानांनी सन्मानित करण्यात आले.
लेफ्टनंट जनरल मिलिंद भुरके यांना अतिविशिष्ट सेवा मेडल या बहुमानाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. मिलिंद भुरके सैनिक स्कूल साताराचे 1979 बॅचचे विद्यार्थी आहेत. तसेच लेफ्टनंट जनरल प्रदीप सी नायर यांना देखील अतिविशिष्ट सेवा मेडल या सन्मानाने गौरवान्वित करण्यात आले. ते सैनिक स्कूल साताराचे 1982 बॅचचे विद्यार्थी आहेत.
25 नोव्हेंबर 2018 रोजी जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत मेजर महेशकुमार भुरे यांच्या नेतृत्वाखालील जवानांच्या पथकाने सहा दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. मेजर महेशकुमार भुरे हे देखील सैनिक स्कूल साताऱ्याचे 2009 चे माजी विद्यार्थी असून त्यांनी दाखवलेल्या या असामान्य साहसासाठी राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना शौर्यचक्र प्रदान करण्यात आले.









