प्रतिनिधी / सातारा
सांगली येथून पनवेलला गायी, बैल यांचे मांस घेऊन जाणारा आयशर टेम्पो शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी संशय आल्याने पोलिसांना माहिती देऊन विना परवाना मांस वाहतूक करणाऱ्या एकास व सेटलमेंट करायला आलेल्या फलटण तालुक्यातील उफळवेच्या दलालास भुईंज पोलिसांच्या हवाली करण्यात आले.भुईंज पोलिसांनी अजमेर अजीज शेख(रा.आरळी, ता. अक्कलकोट) व संतोष विष्णूपंत तंबाते(रा.उफळवे, ता. फलटण) या दोघांना अटक केली आहे.
या बाबत भुईंज पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अनिकेत शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ते व त्यांचे मित्र दुचाकीवरून दि.15 रोजी सायंकाळी 7 वाजता मित्राकडे निघाले होते. वेळे गावच्या हद्दीत आसरा हॉटेलच्या परिसरात एका आयशर टेम्पोतून कुबट वास येत होता.म्हणून त्यांनी केबिनमध्ये मास्क न लावता बसलेला चालक अजमेर शेख यास विचारणा केली.गाडीत काय आहे. तर त्याने गाडीत गाय, बैलाचे मांस असल्याचे सांगितले. तो पर्यंत कार्यकर्त्यांनी पोलिसांना माहिती देताच भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे यांनी पथक पाठवून दिले.त्यानंतर काही वेळातच एक कार आली.
त्या कार मधून आलेला संतोष तंबाते याने गाडी सोडण्याची विनंती पोलिसांकडे केली. त्यावर मांस वाहतुकीचा पशुसंवर्धन विभागाचा परवाना आहे का अशी विचारणा केली. त्यावर नाही असे सांगताच त्या दोघांना भुईंज पोलिसांनी ताब्यात घेऊन दोघांवर महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियम 1976 नुसार 5 सी, 9 ए, भा. द.वि. स.269,188 , 34नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भुईंज पोलीस तपास करत आहेत.पोलीस निरीक्षक आशिष कांबळे हे तपास करत आहेत.









