झेडपीतल्या शौचालयाचे ड्रेनेज उघडेच; बांधकाम विभागाने घेतल्या ‘पेशवेकालिन’ डुलक्या
सातारा / प्रतिनिधी :
सातारा जिल्हा परिषदेने दिल्लीत स्वच्छतेचा डंका एकेकाळी मिळवला होता. त्यावेळचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांची चौखुर नजर असायची. आताचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा हे खूपच विनयशील आहेत. त्यामुळे त्यांनी बांधकामच्या ‘पेशवे’कालीन डुलक्यांना ‘अभय’ देत आपल्या बंगल्याची रंगरंगोटी करुन घेतली. मात्र, इमारतीमध्येच शौचालयाचे ड्रेनेज उघड्यावर आहे. त्यावरचे झाकण तुटून गेल्याने दुर्गंधी निर्माण होत आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले साहेब तुम्हीच आता लक्ष घाला, अशी आर्जव माहिती अधिकार कार्यकर्ते करू लागले आहेत.
जिल्हा परिषदेत सगळाच सावळा गोंधळ सुरु आहे. जिल्हा परिषदेच्या चौथ्या मजल्यावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा हे आल्यापासून तर सर्वच चित्र पालटले आहे. गौडा साहेबांची खूपच विनयशीलता त्यांच्या केबीनबाहेर बदलेल्या रंगीत पाटीवरुनच स्पष्ट होते. रंगीत पाटीसारखीच त्यांच्या बंगल्याच्या आवारात कायापालट डीपीसीच्या निधीतून करण्यात आला. याची माहितीही चक्क माहिती अधिकारात दिली जात नसल्याने यामध्ये गौडबंगाल झाले की काय अशी चर्चा सुरु आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या दोन्ही इमारतींचा स्वच्छता व इतर कामकाजाची व शौचालय दुरुस्तीचे काम प्रामुख्याने बांधकाम विभागाकडे असते. काखेत कळसा अन् गावाला वळसा या म्हणीचा प्रत्यय सातारा जिल्हा परिषदेच्या इमारतीत आल्यानंतर पहायला मिळतो. समाजकल्याण विभागाच्या पाठीमागील बाजूस गेल्यानंतर शौचालयाचे ड्रेनेजवरील झाकण गेल्या काही दिवसापासून उघडेच पडले आहे. नजिकच कॅन्टीन आहे तसेच आरोग्य विभागाचे स्टोअर रुम आहे. सातारा जिह्यात सगळय़ा ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छतेची चळवळ ज्या जिल्हा परिषदेतुन रुजवली त्याच जिल्हा परिषदेच्या इमारतीत बांधकाम विभागाच्या कुचराईमुळे शौचालयाच्या ड्रेनेजचे झाकण उघडयावर आहे याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.
इमारतीत पिण्याचे स्वच्छ पाणी नाही
दोन्ही इमारतींच्या देखभाल दुरुस्तीचे काम हे बांधकाम विभागाकडे आहे. त्याचे काम योग्य पद्धतीने होत नसल्याचे दुसरे उदाहरण म्हणजे दोन्ही इमारतीत स्वच्छ पिण्याचे पाणीच मिळत नाही. केवळ फिल्टर बांधकाम विभागाच्या बाहेर असून तेथून पाणी नेण्यासाठी कर्मचारी ने आण करतात. तसेच महिलांच्या शौचालयामध्येही मुबलक पाणी नसल्याचे अनेकदा महिला कर्मचाऱयांनी ऑफ द रेकॉर्ड सांगितले.
माहितीच्या अधिकाराला कोलदांडा
कोणतीही वर्क ऑर्डर नसताना काम करणे तसे चुकीचेच आहे. जिल्हा परिषदेच्या बंगल्याच्या परिसरात केलेल्या कामाची माहिती काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मागितली गेली. परंतु त्यावरुन माहितीच दिली गेली नाही. त्यामुळे माहितीच्या अधिकाराला कोलदांडा दिला गेल्याने येथे सगळाच अनागोंदी कारभार सुरु आहे.









