प्रतिनिधी / नागठाणे
कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सार्वजनिक प्राथनास्थळे, मंदिरे बंद ठेवण्याचा आदेश सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी देऊनही नागठाणे (ता.सातारा) येथे मंदिरात एकत्रित येऊन प्रार्थना केल्याप्रकरणी बेघरवस्ती मधील १५ जणांसह अज्ञात २० लोकांवर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी नागठाणे येथील बेघर वस्तीत असलेल्या श्री महालक्ष्मी देवीची पूजा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.यावेळी पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळींबकर, हवालदार मनोहर सुर्वे, स्वप्नील माने, किरण निकम , विशाल जाधव, विजय साळुंखे व चालक धनंजय जाधव हे घटनास्थळी पोहचले. यावेळी मंदिरात मोठ्या प्रमाणात जमाव जमून देवीची पूजा करीत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांना पहाताच जमावाची पांगापांग झाली.
यावेळी पोलिसांनी घटनास्थळावरून प्रवीण आण्णा पाटोळे,वनिता विकास पाटोळे,उज्ज्वला राजेंद्र पाटोळे,आण्णा तांबेल पाटोळे,सूरज संजय पाटोळे,सागर दिलीप पवार,विजय पतंगराव पवार,मंदा संजय पाटोळे,मालन तांडेल पाटोळे,अनिता अरुण पाटोळे,मंगल संजय पवार,चतुरा जगन्नाथ पाटोळे,संगीता बाळू पाटोळे,मनोज बाळू पाटोळे (सर्व रा.बेघरवस्ती, नागठाणे, ता.सातारा) व अनिता माई उर्फ अनिल मारुती जाधव ( रा.सैदापुर, ता.सातारा) यांना ताब्यात घेतले.पोलिसांनी यांच्यासह अज्ञात १५ ते २० जणांविरुद्ध भा.दं. वि. स. कलम १८८,आपत्ती व्यवस्थापन अधिनियम कायदा २००५ चे कलम ५१ (ब) व महाराष्ट्र कोविड २०१९ विनियमन २०२० कलम ११ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
Previous Articleमसुरे येथील कुक्कुटपालन शिबिराला प्रतिसाद
Next Article रेल्वे 30 सप्टेंबरपर्यंत बंद?; वाचा यामागचे सत्य








