प्रतिनिधी / गोडोली
“शासनाच्या विविध योजना सर्व सामान्य माणसापर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करा. लोकनियुक्त सरपंच असलेल्या सरपंच परिषदेच्या सदस्यांनी संघटीत राहून गावाबरोबर राज्याच्या सर्वांगिण विकासा आणि चेहरामोहरा बदलण्यासाठी महत्वपूर्ण योगदान द्यावे,” असे आवाहन देशाचे माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी नव्याने स्थापन झालेल्या सरपंच परिषदेच्या लोगोच्या अनावरण करताना केले.
लोकनियुक्त आणि विद्यमान असलेल्या राज्यातील सरपंचांनी एकत्रित येऊन सरपंच परिषद स्थापन केली आहे. सातारा जिल्ह्यातील नागझरीचे सरपंच जितेंद्र भोसले यांच्या नेतृत्वाखाली हि सरपंच परिषद विस्तारित होत असून प्रत्येक जिल्ह्यातील विद्यमान सरपंच याचे सभासद झाले आहेत. या परिषदेच्या लोगोचे अनावरण शरद पवार यांच्या हस्ते आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पुण्यात करण्यात आले.
यावेळी शरद पवार यांनी राज्यातील थेट पद्धतीने निवडून आलेल्या सरपंचांचा समावेश असलेल्या सरपंच परिषदेची स्थापना सर्व सरपंचांच्या एकत्रित पुढाकाराने केली गेली ही एक आनंदाची बाब आहे. जितेंद्र भोसले आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे या पुढाकाराबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन करतो,असे गौरवोद्गार काढले.
यावेळी त्यांनी,’या सरपंच परिषदेच्या निमित्ताने सरपंच मंडळींनी समन्वय ग्रामस्तरावरील विविध समस्यांबद्दल शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी देखील पुढाकार घ्यावा. सरपंच परिषदेतील महिलांची टक्केवारी देखील ५० टक्क्यांपर्यंत राहील,’ अशी अपेक्षा व्यक्त करतो. परिषदेच्या माध्यमातून राज्यात संघटनेचं विभागवार जाळं उभे करावे. अधिकाधिक संघटित शक्ती ग्रामपंचायतींच्या उन्नतीसाठी तुमच्या सर्वांचे योगदान महत्वपूर्ण ठरणार आहे,’ असे सांगून विविध विषयांवर मार्गदर्शन केले.









