प्रतिनिधी / सातारा :
सातारा पंचायत समितीमध्ये सत्ता ही आमदार शिवेंद्रराजे गटाकडे आहे. शिवेंद्रराजेंनी मोठय़ा विश्वासाने कळंबे गावच्या सरिता इंदलकर यांच्यावर सभापतीपदाची जबाबदारी सोपवली गेली. परंतु त्यांच्याकडून गेल्या अडीच वर्षात लोकहिताची कामे न होता केवळ वरकरणी बडा घर पोकळ वसा सुरु असल्याने सत्ताधारी सदस्यांमधूनच सभापतींच्या विरोधात नाराजीचा सूर उमटत आहे. दरम्यान, त्यांनी दोनच दिवसांपूर्वी जाहीर केलेला निधी नेमका कशातून मंजूर करुन आणला?, तो राज्यातील सर्वच ग्रामपंचायतींना देण्यात येतो, अशी सदस्यांमधून चर्चा सुरु आहे. दरम्यान, पंचायत समितीत मनमानी सुरु असल्याची चर्चा सुरु आहे.
सातारा पंचायत समितीमध्ये विद्यमान सभापती सरिता इंदलकर यांच्याबाबत प्रंचड नाराजीचा सूर सदस्यांमधून उमटत आहे. आपल्या गणातील गावावर निधी खर्च करण्याऐवजी त्यांनी स्वतःच्या केबीनवर निधी खर्च केला असून त्याच्या बिलामध्येच बांधकाम विभागाला आणि ठेकेदाराला हाताशी धरुन सुताडगुताड केल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. सेस फंड वाटप करतानाही विरोधी गटाच्या सदस्यांबरोबरच सत्ताधारी गटातील सदस्यांनाही दुजाभाव केल्याचे सदस्यांमधून बोलले जात आहे.
दरम्यान, सातारा पंचायत समितीमध्ये बांधकाम विभागावर कसलेही नियंत्रण नाही. कधीही या आणि कधीही जा, असाच उपक्रम बांधकाम विभागात सुरु आहे. सातारा तालुक्यातील अनेक ठेकेदार हे काम मिळवण्यासाठी पुढाऱयांच्या नावाचा वापर करतात. त्यामुळे कामेही अशीतशीच होताना दिसतात. कर्मचारीही टेबलवर दिसत नाहीत. पाणी पुरवठा विभागात नव्याने आलेले अभियंता रोडे यांना अद्यापही पूर्ण ज्ञात नसल्याने अनेक कामे तालुक्यातील तशीच प्रलंबित आहेत. काही कर्मचाऱयांची अन्य कार्यालयात पद असतानाही सातारा पंचायत समितीमध्ये काम करताना पहायला मिळतात. सातारा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पवार हेही चांगले काम करतात परंतु त्यांच्यावर दडपशाही सुरु असल्याचे स्पष्ट होत आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी सातारच्या सभापती सरिता इंदलकर यांनी सातारा तालुक्यातील 191 गावांना निधी आणण्याची घोषणा केली होती. तो निधी थेट ग्रामपंचायतींकडे येतो. त्यामुळे सभापतींनी असा नवीन कोणता निधी आणला गेला आहे. जर निधी आणला गेला नसेल तर स्वतःचा फंड टाकावा, अशी मागणी होवू लागली आहे.
कार्यालयाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष
सभापती सरिता इंदलकर यांनी नेहमीच सातारा पंचायत समितीची इमारत ही स्वतःच्या मालकीच्या जागेत असावी यासाठी मागणी केली होती. त्याच्या उलट बाब त्यांनी स्वतःच्या केबीनचे नुतनीकरण करुन घेतले. परंतु कार्यालयाच्या स्वच्छतेबाबत एकदाही ठोस कार्यवाही केली नाही, अशीही चर्चा सध्या सुरु आहे.