सातारा / प्रतिनिधी :
सातारा शहरालगत असलेल्या सैदापूर येथे घरातील पाण्याच्या मोटारीची पिन लावत असताना शॉक लागल्याने एका तेरा वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली.
सानिका सुरेश घाडगे (रा. सैदापूर, ता. सातारा) असे शॉक लागून मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. या घटनेची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सानिका ही मंगळावार, दि. 6 रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घरी पाणी भरत होती. यावेळी ती विद्युत मोटारीची पिन घरात असणाऱ्या स्वीच बोर्डला जोडण्यासाठी गेली. याचवेळी तिला शॉक लागला आणि ती बेशुध्द झाली. या घटनेनंतर तिला बेशुध्दावस्थेतच क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचार सुरु असतानाच तिचा मृत्यू झाला. अधिक तपास पोलीस हवालदार कदम हे करत आहेत.









