प्रतिनिधी / वाठार किरोली
तारगाव येथील रेल्वे स्टेशनलगत रयत शिक्षण संस्थेच्या, ग्रामस्थांनी बक्षिसपत्र केलेल्या शेतकरी हायस्कूलच्या मालिकच्या जमिनीत काही दिवसापूर्वी रेल्वेच्या सबस्टेशनचे काम करण्याचा प्रयत्न केला होता .यावेळी ग्रामस्थांनी विरोध करून हाणून पाडला होता. याबाबत रेल्वेच्या पॉवर ग्रीड कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांना संपूर्ण कागदोपत्री माहिती समजल्यानंतर रेल्वे लाईनच्या इलेक्ट्रिक सबस्टेशनचे काम रद्द करून ते शाळेचा ४०० मीटरचा परिसर सोडून इतरत्र घेण्याचे ग्रामस्थांसोबत झालेल्या बैठकीत मान्य केले.
यावेळी विकास थोरात यांनी शेतकरी हायस्कूलचे पूर्वीचे महसूलचे १९३२ सालापासूनचे व १८६६ पासूनचे भूमी अभिलेखचे नकाशे टीपण,फाळणी हे रेकॉर्ड रेल्वे विभागाच्या पाँवर ग्रीड कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांना समजावून सांगून तसेच याच हद्दिशेजारून जाणारा पाश्चिमेकडील तारगाव स्टेशन ते किरोली हद्दीपर्यंतचा एकमेव असणारा रेल्वे लाईन शेजारचा सर्वे नंबर नकाशावरील रस्ता बंद होणार होता व याचा फटका साधारणतः ७००ते ७५० एकर ऊस व आले बागायती क्षेत्राला बसणार होता परंतु या विषयीच्या सविस्तर सर्व तांत्रिक व महसूली बाबी कागदोपत्री पटवून दिल्यानंतर शाळेच्या हद्दीत होणारे सबस्टेशन इतरञ हलविण्याचे रेल्वेअधिकाऱ्यांनी मान्य केल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला.
यावेळी पंचायत समिती सदस्य आण्णासो निकम, दिलीप देशमुख,दिलीप मोरे, राजेंद्रकुमार मोरे, शामसुंदर जंगम, सुरेश थोरात, सुशिल घोरपडे, अशोक तावरे,चंद्रकांत आप्पा घोरपडे, उत्तम मोरे, प्रशांत निकम, प्रकाश भोसले, राजकुमार मोरे, भरत निकम, संतोष मोरे, संजय गायकवाड, दत्तात्रय बळीप आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यातील रेल्वे दुहेरीकरणाचा व विद्युतीकरणाचा प्रश्न माननीय खासदार श्रीनिवास पाटील साहेबांच्या प्रयत्नामुळे व काही महिन्यापूर्वी रेल्वे राज्यमंत्रासोबतच्या बैठकीमुळे तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने मार्गी लागत आहे. परंतु रेल्वे अधिकाऱ्यांच्या खाजगी एजन्सीच्या सदोष नकाशांमुळे व जमिनींच्या मोजमापातील चुकीच्या बदलांमुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढत आहेत, यासाठी रेल्वे प्रशासन, महसूल, भुमी अभिलेख व शेतकरी यांच्यात योग्यसमन्वय असण्याची गरज निर्माण झाली आहे.









