प्रतिनिधी/ नागठाणे
शेंद्रे (ता. सातारा) येथील ४२ वर्षीय महिलेस कोरोनाची लागण झाली. बाधित महिला ही मुंबईहून गावी आली आहे. यानंतर प्रशासनाने शेंद्रे, वेचले ही दोन गावे कंटेन्मेंट झोन तर वळसे बफर झोन मध्ये समाविष्ट केली आहेत.
मुंबईतील साकीनाका परिसरातून १८ मे रोजी सकाळी संबधित महिला, तिचा पती आपल्या दोन मुलांसह शेंद्रे येथे आली. महिलेस कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट होताच तिच्या संपर्कात आलेले पती व दोन मुलांना सातारा येथे विलगीकरण करण्यात आले आहे. आणखी पाच जणांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.
प्रशासनाने याबाबत तत्काळ हालचाली करत उपाययोजना केल्या आहेत. शेंद्रे व वेचले ही गावे कंटेटमेंट झोन म्हणून, तर लगतचे वळसे हे गाव बपर झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. तहसीलदार आशा होळकर, कुमठे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. शेलार, तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी आज दिवसभर परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून होते. प्रभावीत क्षेत्रात उपाययोजना सुरू करण्यात आल्या अाहेत. ग्रामस्थांची घरोघरी जाऊन तपासणी व सर्व्हे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ग्राम कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने गावातील मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्ते बंद केले आहेत. वैद्यकीय सेवा वगळता अन्य कारणांसाठी ग्रामस्थांना बाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
Previous Articleकोल्हापूर : जुगार अड्यावर छापा, 11 लाख 43 हजाराचा मुद्देमाल जप्त
Next Article नजीकच्या भविष्यात देशात क्रीडास्पर्धा अशक्य : रिजीजू







