सातारा / प्रतिनिधी
दिवाळी सणानिमित्त प्रत्येक घरात आनंद, उत्साहाचे वातावरण असते. मात्र, सातारा तालुक्यातील खंडोबाचीवाडी येथील शिंदे कुटुंबियांवर संकट आल्याने नैराशाचे वातावरण होते. अशा वेळी रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून मदतीचा हात दिल्याने कॅन्सरग्रस्त बाळावर उपचार होऊ शकले. एेन सणाच्या दिवशी शिंदे कुटुंबीयांच्या जीवन प्रकाशमान झाले.
पुणे-बेंगलोर महामार्गालगत असलेल्या लिंब गावापासून अवघ्या तीन किलो मीटर अंतरावर असलेल्या खंडोबाचीवाडी येथील दिनकर शिंदे यांचे कुटुंब राहते. या कुटुंबाची परिस्थिती जेमतेम असून मागील काही वर्षांपासून त्यांच्या कुटुंबावर वेगवेगळ्या स्वरुपाची संकटे येत होती. त्याच्याविरोधात लढत असताना त्यांच्या घरात मुलांचा जन्म झाला. त्याचे कुटुंबियांनी कृष्णा हे नाव ठेवले. काही दिवसापूर्वीपासून त्याच्या मानेवर एक गाठ आली होती. सातारा येथील रुग्णालयात तपासणी केली असता ती गाठ साधीसुधी नसून कॅन्सरची असल्याचे निष्पण झाले. तसे शिंदे कुटुंबीयांवर आभाळ कोसळले.
कॅन्सरसारख्या दुर्धऱ आजारावर उपचार करण्यासाठी शिंदे कुटुंबियाकडे पैशांची चणचण होती. ही बाब शिवथऱ येथील प्रकाश साबळे यांना समजली. त्यांनी तातडीने शिंदे कुटुंबियांकडे धाव घेऊन मदतीचा हात पुढे केले. रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या माध्यमातून प्रकाश साबळे यांनी कृ्ष्णाच्या उपचारासाठी मुंबईतील टाटा हाॅस्पीटलमध्ये धावधाव केली. त्यानंतर दिवाळीच्या दिवशी तेथे कृष्णावर शस्त्रक्रिया करण्यात आली. कृष्णाच्या उपचारासाठी आमदार सदाभाऊ खोत, प्रकाश साबळे आणि सहकार्यांनी मदतीचा हात पुढे केल्याने त्याला जीवदान मिळाले. त्याच्यावर मुंबईतील टाटा हाॅस्पीटलमध्ये उपचार होऊ शकले. त्यामुळे शिंदे कुटुंबीयाच्या जीवनात एेनदिवाळी प्रकाश निर्माण झाला. तसेच कृष्णामध्ये नवी उमेद निर्माण केली. प्रकाश साबळे यांनी केलेल्या या मदतीमुळे दिनकर शिंदे यांना गहिवरून आले.









