शाहूपुरी : सातारा नगरपालिकेची हद्दवाढ झाल्याने त्रिशंकू भाग शहर हद्दीत आला आहे. त्यामुळे नगराध्यक्ष फंडातून शाहूनगर परिसरातील एस.टी. कॉलनी ते अजिंक्य बझार रस्त्याची तातडीने दुरुस्त करण्याची मागणी ॲड. सचिन तिरोडकर यांनी निवेदनाद्वारे केली. नगराध्यक्षा माधवी कदम यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सातारा नगरपालिकेची हद्दवाढ झाल्याने शाहूनगर हा त्रिशंकू
भाग शहर हद्दीत समाविष्ट झाला आहे.
शाहूनगर एसटी कॉलनी-गुरुकृपा कॉलनी ते अजिंक्य बझार चौक हा रस्ता वर्दळीचा आहे. मात्र, या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. खड्डे पडल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. पादचाऱ्यांनाही गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. साईडपट्ट्या खचल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवालाही धोका निर्माण झाला आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती होणे आवश्यक आहे. या रस्त्याची दुरुस्ती नगराध्यक्षांच्या राखीव फंडातून करावी. या रस्त्याच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देऊन
शाहूनगरवासीयांना दिलासा द्यावा, अशी मागणी तिरोडकर यांनी केली. निवेदनाची प्रत उपनगराध्यक्ष मनोज शेंडे आणि बांधकाम सभापती मिलिंद काकडे यांना देण्यात आली आहे.









