विशाल कदम/ सातारा
शहरातल्या प्रत्येक वॉर्डात पालिका कर्मचाऱयांच्यावतीने प्रबोधन केले जात आहे. घरोघरी तयार होणारा ओला आणि सुका कचरा उचलण्याची सोय केली आहे. ज्या काही त्रुटी आहेत. त्या दूर करण्याचे काम तत्काळ केले जात आहे. दरम्यान, स्वच्छ सर्वेक्षणात देशात पहिल्या दहामध्ये येण्याचा मान हा सातारा शहरालाच मिळणार आहे, असा ठाम विश्वास मुख्याधिकारी शंकर गोरे आणि उपमुख्याधिकारी संचित धुमाळ यांनी मीडियाशी बोलताना व्यक्त केला. शहरात नव्यानेच 18 शौचालय टकाटक केली आहेत. त्यातील सहा स्वच्छतागृह हे पे स्वरुपातील आहेत. महिलांसाठी शहरात पिंक टॉयलेट सुरु करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, शुक्रवारी राज्य पातळीवरुन स्वच्छ सर्वेक्षण टीम पाहणीकरता आली होती.
शहरात स्वच्छतेला प्राधान्य देण्यात येत आहे. प्रत्येक वॉर्डात जागरुकता करण्यात आली आहे. पालिकेचे कर्मचारी जेथे-जेथे कचरा निर्माण होतो, अशा ठिकाणी कचरामुक्त कशी होतील याकरता प्रयत्न करत आहेत. नागरिकांना तशा सूचनाही देत आहेत. त्यामुळे यावर्षी सातारा शहर हे स्वच्छ भारत अभियानात पहिल्या दहामध्ये येणारच, असा ठाम विश्वास पालिका प्रशासनाच्यावतीने मुख्याधिकारी शंकर गोरे आणि उपमुख्याधिकारी संचित धुमाळ यांनी केला आहे. सातारा शहरात राजवाडा बसस्थानक, राजवाडा चौपाटी, जुनी भाजी मंडई, रविवार पेठ मार्केट यार्ड, सातारा बसस्थानक आणि गोडोली नाका ही सार्वजनिक शौचालये व स्वच्छतागृह देखभालीसह चालवण्याकरता दिली गेली आहेत. त्यांचे नूतनीकरण करण्यात आले आहे. लोकांच्यासाठी तरडे घर शाहू गार्डन, मुक्तांगण एलबीएस कॉलेजच्याजवळ, सतीआई मंदिर करंजे कमान, शनिवार पेठेतल्या भावे बोळात, गवंडी आळीत, लेवे घर चिमणपुरा, खडकेश्वर शाळेजवळ, आमणेघर सदरबझार येथे तर लोणार गल्ली, पोळवस्ती, कैकाडवस्ती, राजलक्ष्मी टॉकीजमागे, कडाळे घर ही शौचालये नवीन करण्यात आली आहेत. तसेच महिलांसाठी शहरात सर्व्हे करुन ठिकठिकाणी पिंक टॉयलेट बसवण्यात येणार आहेत. पोवई नाका येथे ग्रेड सेपरेटरचे काम पूर्ण झाल्यानंतर नियोजित ठिकाणी स्वच्छतागृह सुरु करण्यात येणार आहे, असे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.::
स्वच्छ भारत मिशनच्या टीमकडून पाहणी
‘स्वच्छ सर्वेक्षण 2020’चे अंतिम सर्वेक्षण होणार आहे. त्याकरता शुक्रवारी शहराची पाहणी करण्याकरता राज्याच्या टीमच्या श्रीमती पल्लवी यांनी सातारा शहराला भेट दिली. शहरात ज्या-ज्या ठिकाणी त्यांनी भेटी दिल्या त्या-त्या ठिकाणी नेमक्या काय त्रुटी आहेत ते प्रशासनाला लगेच सुचित केले आहे. त्यामध्ये सुधारणा करण्यास सांगितले असल्याचे समजते.::









