●शहापूर योजनेचा बिघडलेला पंप दुरुस्तीचे काम सुरू
●प्रत्येक भागात आठवड्यात एक दिवस पाणी येणार नाही
प्रतिनिधी/सातारा
शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शहापूर योजनेच्या दोनशे एचपीचा पंप बिघडला आहे. त्यामुळे शहरात पाणी कपातीचे संकट ओढवले आहे. दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.1सप्टेंबर पर्यंत आठवड्यातून एक दिवस पाणी येणार नाही. नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन पाणी पुरवठा सभापती यशोधन नारकर यांनी केले आहे.
शहापूर येथील उरमोडी नदीवरील उद्भव येथून 200 एचपीच्या दोन पंपाद्वारे पाणी उपसा करून शहरातील नागरिकांना पाणी पुरवठा केला जातो.गेल्या दोन दिवसांपासून 200 एच पी चा पंप अचानक नादुरुस्त झाला. पंप नादुरुस्त झाल्याने शाहूपुर माध्यमातून उपसा केंद्रावर पाणी उपसा करण्याचे प्रमाण 50 टक्के कमी झाले आहे. त्यामुळे शहापूर माध्यमातून पाणी पुरवठा होणाऱ्या टाक्यांना पुरेशी लेव्हल मिळत नाही. त्याचा परिणाम शहरात पाणी पुरवठ्यावर होत आहे. हा पंप दुरुस्ती करण्यासाठी दोन आठवड्यांचा कालावधी लागणार आहे. यासाठी दि.21 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर अखेर शहरातील पाणी पुरवठा आठवड्यातून एक दिवस पाणी कपात करणे गरजेचे आहे. या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करता कास व शहापूर माध्यमातून आठवड्यातून एक दिवस पाणी कपात करणे आवश्यक आहे. याबाबीचा विचार करता नागरिकांना शहापूर माध्यमातून तांत्रिक अडचणीमुळे पाणी पूरवठा करण्याच्या दृष्टिकोनातून पाणी कपात करण्यात येणार आहे.
नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे आवाहन पाणी पुरवठा सभापती यशोधन नारकर यांनी केले आहे.सोमवारी राजवाडा टाकी आणि पंपिंग लाईन वर कपात होणार आहे.मंगळवारी घोरपडे टाकी दुपारच्या सत्रात, बुधवारी घोरपडे टाकी सकाळच्या सत्रात, गुरुवारी गुरुवार टाकी पहिला झोन,दुसरा झोन, गणेश टाकीवरून सोडण्यात येणारे पाणी, शुक्रवारी बुधवार नाका टाकी, रविवार यशवंत गार्डन टाकी वरून कपात करण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले.









