एक आरोग्यकर्मी तर दुसरा सोलापूरहुन आलेला प्रवासी
प्रतिनिधी / सातारा
जिल्ह्यात कोरोनाचे ७३८ झाले असले तरी शहर मात्र कोरोनामुक्त होते. मात्र रविवारी एक तर सोमवारी एक असे दोघे बाधित सापडल्याने शहराची जबाबदारी आणखी वाढली आहे.
शाहूनगरच्या दत्त कॉलनीत सापडला बाधित
शाहूनगरच्या अजिंक्य बझार चौकातून जगतापवाडी कडे जाताना ओढ्यावरील वळणाच्या उजव्या बाजूला असणाऱ्या दत्त कॉलनीमध्ये एक ५२ वर्षीय पुरुष बाधित असल्याचा अहवाल आला आहे. सदर व्यक्ती ही मूळची सोलापूर शहर येथील रहिवासी आहे. शाहूनगर येथील अंत्यविधीसाठी ते साताऱ्यात आले होते, असे प्रशासनाने सांगितले आहे. दत्त कॉलोनी सील करण्याचे काम सुरू आहे.
शाहूनगरमध्ये अफवांचे पीक
दरम्यान, सातारच्या शाहूनगरमध्ये सोमवार अफवांचे पीक घेऊन उगवला. या अफवांमळे BSNL चौक किंवा BSNL कॉलनी येथे प्रचंड घबराहट निर्माण झाली होती.
मंगळवार पेठेत कोरोनाचा शिरकाव
शहराच्या पश्चिम भागात असलेल्या मंगळवार पेठेत कोरोनाबाधित रुग्ण सापडला आहे. सदर महिला कोरेगाव आरोग्य केंद्रात आरोग्य कर्मी म्हणून कार्यरत आहे. यापूर्वी शहरात राहणाऱ्या दोन आरोग्यकर्मी महिला बाधित म्हणून सापडल्या होत्या मात्र त्या दोघींनी कोरोनावर मात केली आहे.
शहरातली सर्वात मोठी पेठ, पण ठराविक भाग होणार कंटेन्मेंट
साताऱ्यात ही पेठ आकाराने सर्वात मोठी आहे. मात्र होलार समाज मंदिर परिसर आता कंटेंमेंट झोन करण्याची प्रक्रिया सोमवारी सकाळी सुरू झाली आहे. हे दोन्ही भाग सॅनिटाईज करण्यासाठी पालिकेच्या दोन टीम करण्यात आल्या असून प्रशासकीय यंत्रणा तैनात आहेत. नागरिकांनी अकारण भिऊन जाण्या ऐवजी योग्य त्या काळजी घ्याव्यात असे आवाहन पालिका सीईओ शंकर गोरे यांनी केले आहे.
सातारकरांनो सवयभान बाळगलेच पाहिजे
शहरात सध्या सवयभान चळवळ सुरू झाली असून सातरकरांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला आहे. मात्र ही चळवळ आता केवळ सांगून चालणार नाही तर प्रत्यक्ष कृतीतून त्यात सहभागी होण्याची वेळ आली आहे.