शहापूरच्या 200 एचपी मोटरने केला बट्याबोळ
त्यात पाणी पुरवठा विभागावर कोरोनाचे विघ्न
नागरिक आंदोलन करण्याच्या पावित्र्यात
पावसाळ्यात नुसतेच वाहते पाणी पाहण्याचा सातारकर घेताहेत आनंद
प्रतिनिधी / सातारा
शहरात गेल्या एक महिन्यापासून पाण्याचा ठणाणा सुरू झाला आहे. पावसाचे पाणी वाहताना दिसत आहे. परंतु नागरिकांना पिण्याचे आणि खर्चाचे मुबलक पाणी मिळत नाही. शहापूर उपसा योजनेची मोटर दुरुस्तीला दिली होती. तरीही अद्याप ती समस्या सुटली नाही.शहरातील बहुतांशी भागात अपुऱ्या दाबाने पाणी येत आहे. नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. दरम्यान, पाणी पुरवठा विभाग हा सध्या कोरोनाच्या ग्रहणात अडकला आहे.
शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शहापूर उदभव योजनेची दुरुस्ती गेले एक महिन्यापासून सुरू आहे. उपसा करण्यासाठी असणाऱ्या दोन मोटारी दुरुस्तीसाठी सांगली येथे नेल्या होत्या. तरीही जेवढ्या क्षमतेने पाणी उपसा व्हायला हवा तो होत नाही. त्यामुळे पाण्याच्या साठवण टाकीला लेव्हल मिळत नाही. शहरातील यशवंत गार्डन, गुरुवार पेठ टाकी, जेल टाकी, शुक्रवार टाकीतून होणारा पाणी पुरवठा कमी दाबाने होत आहे. सध्या पावसाचे दिवस आहेत. या पावसाळ्यात तरी मुबलक पाणी मिळावे अशी मागणी होत असून नागरिक रस्त्यावर उतरतील असे चित्र सध्या आहे.दरम्यान, पाणी पुरवठा विभागात कोरोनाचा शिरकाव झाल्याने काही कर्मचारी बाधित होऊन उपचार घेत आहेत. त्यामुळे पाणी पुरवठा विभाग सध्या संकटात सापडला आहे.
चौकाचौकात नागरिक निषेध करतील : नगरसेवक धनंजय जांभळे
आम्हाला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.सकाळपासून फोन वर फोन येत आहेत.कित्येक वेळा नागरिकांना मुबलक पाणी मिळावे म्हणून तक्रारी मांडल्या.सुधारणा होत नसेल तर तुम्ही अयशस्वी ठरत आहात.नागरिक रस्त्यावर उतरून चौकाचौकात निषेध करतील.









