शाहूपुरी : सातारा शहराच्या तिन्ही बाजूंना डोंगर असल्याने पावसाचे पाणी डोंगरावरून वाहत शहरात येते. सातारा शहरातील गल्लोगल्ली ओढे आहेत. या ओढ्यांना डिसेंबरपर्यंत पाणी असते. त्यामुळे ओढ्यात मोठ्या प्रमाणावर गवत, एरंडाची झाडे उगवलेली आहेत. सातारा पालिकेच्या स्वच्छता कामगारांनी ही झाडे तोडून स्वच्छता करण्यास सुरुवात केली आहे.
सातारा शहरात ठिकठिकाणाहून ओढे गेलेले आहेत. त्या ओढ्यांना अजूनही पाणी असल्याने मोठ्या प्रमाणावर झाडे उगवलेली आहेत. त्यातच ओढ्यांच्या कडेला मोठ्या इमारती असून, त्यांचे सांडपाणीही ओढ्यात सोडले असल्याने दुर्गंधीसुटत असते. तसेच डासांचा त्रास सहन करावा लागतो. ओढ्यात एरंडाची झाडे, गवत मोठ्या प्रमाणावर असल्याने अडगळ निर्माण झाली आहे. त्यामुळे मोठमोठ्या धामिनी, घोणस या विषारी जातीचे साप जास्त आहेत. त्यामुळे लहान मुलांना धोका वाढलेला असल्याने ओढे, सफाईची मागणी केली जात होती.
सातारा पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ओढ्यात उतरुन गवत काढण्यास सुरुवात केली आहे. ते गवत वाळल्यानंतर पेटवून दिले जात आहे.
तर ओढ्यातील गवत, झाडे पेटवून न देता ते सोनगाव कचरा डेपोमध्ये टाकावे, त्यामुळे चांगले खत तयार होईल, अशी मागणी पर्यावरण प्रेमींमधून करण्यात येतआहे.









