प्रतिनिधी / सातारा
उद्यापासून सातारा शहरातील सर्व माध्यमिक शाळा सुरु होणार आहेत. त्याच अनुषंगाने खासदार उदयनराजेयांच्या सुचनेनसार उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी शहरातील सर्वच माध्यमिक शाळांची ऑनलाईन तातडीने बैठक घेवुन त्यांचा आढावा घेतला. आढाव्यात शाळांनी नेमक्या काय काय उपाययोजना केलेल्या आहेत. याची माहिती घेत वर्ग पालिकेकडून सॅनिटायझर करुन देण्यात आल्या. जिथे अडचण येईल तेथे पालिकेशी संपर्क साधा, सर्वतोपरी सहकार्य खासदार उदयनराजे महाराज यांच्या मार्गदर्शनानुसार सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही शाळांच्या प्रतिनिधींना उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी दिली.
सातारा शहरातल्या माध्यमिक शाळांची आज सकाळी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी बैठक घेतली. या बैठकीला अनंत इंग्लिश स्कूलच शौकत शेख, श्रीपतराव पाटील हायस्कूलच्या श्रीमती शिवदास, महाराजा सयाजीराव विद्यालयाचे डी.जी.जाधव, न्यू इंग्लिश स्कूलच्या स्नेहल कुलकर्णी, कन्या शाळेच्या सौ. कविता जगताप, भवानी विद्यामंदिरचे सुभाष कदम, अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाचे विलास महाडिक, सुशिलादेवी हायस्कूलच्या श्रीमती एस.आर.यादव, भिमाबाई आंबेडकर शाळेच्या सौ. ए.ए.पाटील, मराठी मिशनचे आपटे, प्रतापसिंह हायस्कूलच्या सौ. मुजावर, कन्या विद्यालयाच्या नंदिनी यादव, उर्दू हायस्कूलचे आसिफ बेदरेकर, भवानी नाईट हायस्कूलचे राजकुमार कांबळे आणि पालिका शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी मारुती भांगे हे सहभागी झाले होते. उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी शाळांनी नेमक्या काय काय उपाय योजना केलेल्या आहेत. शिक्षकांची रॅपिड टेस्ट करण्यात आली आहे का?, विद्यार्थ्यांच्या हातावर प्रत्येक तासाला सॅनिटायझर दिले जाणार काय ?, मुलांची थर्मल स्कॅनिंग केले पाहिजे, बाकावर मुलांची नावे टाकून तेथेच बसण्यास सांगा, सतत बाकांची आदलाबदल नको, एकाच ठिकाणी गर्दी होवू नये याची काळजी घ्या, आदी सुचना केल्या.
सर्वच शाळांच्या खोल्या केल्या सॅनिटायझर
खासदार उदयनराजे यांनी दिलेल्या सुचनेनुसार उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी शहरातील सर्व माध्यमिक शाळांचे वर्ग सॉनिटायझर करवून घेण्यात आले आहेत. शाळांनी ज्या वर्गखोल्या दाखवल्या त्या पालिका प्रशासनाने सॅनिटायझर करुन घेतल्या आहेत. जेथे जेथे अडचण येईल तेथे तेथे मदत करण्याची ग्वाही उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी शाळां व्यवस्थापनांना दिली आहे.









