सातारा / प्रतिनिधी :
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या स्व.यशवंतराव चव्हाण सभागृहात व्हर्च्युअल रॅलीचे शनिवारी (दि.12) सकाळी 10 वाजता आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
पत्रकार परिषदेत बोलताना माने म्हणाले, शरद पवार 81 वर्षात पदार्पण करत आहेत. त्यानिमित्ताने पक्षाच्यावतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यात रक्ताचा तुटवडा असल्याने राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आवाहन केल्यानुसार रक्तदान शिबिर जिल्ह्यात आयोजित करण्यात आले आहे. तसेच सांस्कृतिक सेलच्यावतीने 80 वर्षाचा अपराजित योद्धा ऑनलाईन चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. जिल्हा बँकेच्या सभागृहात व्हर्च्युअल रॅलीचे आयोजन करण्यात आले असून, सर्व सामाजिक, राजकीय व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. यावेळी पवारांच्या कार्याची चित्रफीत दाखवण्यात येणार आहे.









