सातारा / प्रतिनिधी :
शिवक्रांती हिंदवी सेना संचालित दुर्गवारी संकल्पनेतून गेली 5 वर्ष स्वराज्याचे शस्त्रागार किल्ले वैराटगड येथे शिवक्रांती नित्यक्रम वैराटगड संवर्धन कार्य करीत आहे. गतवर्षी गडावरील शिवस्मारक व शिवजन्मोत्सवसाठी जो उत्साह होता तोच आजही जाणवला. शिवजन्मोत्सव 2021 साठी गडावरील माहिती फलक व संवर्धन कार्याची मोहिम दि. 3 रोजी उत्साहात पार पडली.
व्याजवाडी दिशेने प्रस्थान करीत जागोजागी फलक लावण्यात आले. पांडव टाके, शिवपिंड, तळमाची, प्राचीन गुहा, पाण्याचे तलाव, महाद्वार, पिण्याचे पाणी, सरदारांचे वाडे, पहारेकरी देवड्या, चोरवाट,ध्वजस्तंभ, उताणा मारुती, शिवकालीन विहीर, बालसिद्धनाथ मंदिर सारखे नवीन फलक गडावर लावले गेले. लोखंडी पहार, माहिती फलक, सिमेंट, वाळू अशा वस्तू नेताना मावळ्यांना प्रचंड त्रास झाला पण शेवटी शिवकार्यासाठी सदैव तत्पर असणाऱ्या मावळ्यांनी ही मोहीम फत्ते केलीच.
मोहिमेत संदेश धोत्रे, अनिकेत धनावडे, आकाश जाधव, प्रताप जगताप, विराज पिसाळ, देवांग चव्हाण, श्रीजय कदम, भास्कर पवार, प्रविण कदम, स्वप्निल धनावडे आदी मावळ्यांनी सहभाग घेतला होता.









