प्रतिनिधी / उंब्रज :
वीज बिले माफ करून सुरु असलेली सक्तीची वसुली तात्काळ थांबवावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवारी उंब्रज येथे महावितरणच्या कार्यालयाबाहेर पाटण पंढरपूर राज्य मार्ग रोखून निषेध करण्यात आला. तसेच यावेळी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन उंब्रज परिसरातील ग्राहकांशी अरेरावी करू नये, असा समज दिला. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत शेतकरी व नागरिकांची वीजबिले आघाडी सरकारने तात्काळ माफ करावीत, अशी मागणी केली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवारी सकाळी उंब्रज येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून वीज वितरण विरोधात घोषणाबाजी देत आंदोलनाला सुरुवात झाली. आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब यादव, स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवानंद पाटील, प्रमोद जगदाळे, विक्रमसिंह कदम, कॅप्टन इंद्रजीत जाधव, रामचंद्र साळुंखे, सुरेश पाटील, वसंत पाटील, शरद जाधव, महेश जाधव, दत्ता थोरात, दिग्विजय कदम व शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता.
बाजारपेठ चौकातून वीज वितरण कार्यालयापर्यंत आंदोलकांनी घोषणाबाजी करत पाटण पंढरपूर राज्य मार्ग वरील वाहतूक काहीकाळ रोखली. दरम्यान आंदोलकांनी वीज वितरणचे अभियंता कुंभार यांना निवेदन देऊन वीज बिल माफ करून सक्तीची वसुली थांबवावी, ज्यांची वीज कपात केली आहे ती त्वरित जोडून द्यावी, वीजबिलात संपूर्ण माफी मिळावी, लॉकडाऊन कालावधीत दिलेली अंदाजी वीजबिले मागे घ्यावीत, अशी मागणी केली.









