प्रतिनिधी / वडूज
गोरेगाव (निमसोड) ता. खटाव येथील ग्रामपंचायत व शासकीय खात्यासंदर्भात विरोधकांनी केलेले आरोप निव्वळ बिनबुडाचे आहेत. ग्रामपंचायत निवडणूकीत झालेल्या मोठ्या फरकाच्या पराभवाच्या नैराश्यातून ते नाहक चिखलफेक करत आहेत. असा आरोप सरपंच सुशिलकुमार उर्फ पिंटूशेठ डोईफोडे यांनी केला आहे.
याबाबत त्यांनी दिलेल्या निवेदनातील अधिक माहिती अशी, आपले वडील दत्तु खाशाबा डोईफोडे हे प्रामाणिक माजी सैनिक आहेत. त्यांनी आपण सरपंच होण्याअगोदर कृषी खात्याच्या काही योजनांचा लाभ घेतला आहे. तसेच त्याचवेळी आई जिजाबाई डोईफोडे यांच्या नावावर विहीरीचे अनुदान घेतले आहे. वडीलांच्या नांवे रोटाव्हेटर, पॉवर टीलर हे साहित्य घेतले आहे. ते आजही आमच्या घरी आहे. या साहित्याची कोणत्याही प्रकारची खरेदी-विक्री झाली नाही.
अंबवडे-गोरेगांव रस्त्यावरील वनविभागाच्या हद्दीत असणार्या जागेतून गावातील अनेकजण घर बांधणीसाठी किरकोळ प्रमाणात मोफत मुरुम नेत असतात. त्यांना कोणासाही अटकाव होत नाही. मात्र काही लोकांनी शेताच्या ताली धरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मुरुम उपसा करत होते. त्यास अटकाव केल्यानेच आपण तसेच प्रशासना विरोधात नाहक तक्रारी सुरु आहेत.
तसेच आपणाकडे अनेक वर्षे ट्रॅक्टर, जे.सी.बी. व इतर वाहने आहेत. ही वाहने गावातील गरजू लोक तसेच सार्वजनिक कामासाठी नाममात्र भाड्याने दिली जातात. रस्त्याचे काम ज्या ठेकेदारांनी केले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता मुरमाचे पैसे कोणी घेतले ? याचा खुलासा नक्कीच कळेल. विक्रम डोईफोडे यांचे वर्तन म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असे आहे. हा प्रकार त्यांनी वेळीच थांबवावा अन्यथा त्यांच्यावर ग्रामपंचायतीच्या वतीने तसेच आपणामार्फत व्यक्तिगत अब्रुनुकसानीचा दावा दाखल करु असा इशाराही श्री. पिंटूशेठ डोईफोडे यांनी निवेदनात दिला आहे.