कराड / प्रतिनिधी :
दोन दिवसापूर्वी मुंढे गावच्या एका युवकाचे साडे आठ हजार रुपये मोटारसायकलवरून जात असताना कराड शहरातील विजय दिवस चौकात पडले. त्या चौकात सेवा बजावत असलेले वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस कर्मचारी किशोर सोनवणे यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी ते पैसे उचलले व ते युवक शोध घेत आल्यानंतर त्याला परत केले. सोनवणे यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे यांनी सोनवणे यांचा शहर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांचा सत्कार केला. याप्रसंगी कराडचे उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत पाटील, कराड शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील व शहर काँग्रेसचे सुनील बरिदे उपस्थित होते.
शिवराज मोरे म्हणाले की, धावपळीच्या आजच्या जगात वाहतूक नियंत्रण विभागाचे किशोर सोनवणे यांनी दाखवलेला प्रामाणिकपणा हा सर्वांनाच प्रेरणा देणारा आहे. पोलीस हा आपला रक्षक असतो. तो आपल्यासाठीच जगत असतो आणि जागत असतो, याचा प्रत्यय पोलीस सेवा बजावीत असताना येत असतो. किशोर सोनवणे यांचा प्रामाणिकपणा कौतुकास्पद व समाजाला सामाजिक संदेश देणारा आहे. पोलीस हे आपल्या दैनंदिन जीवनातील मार्गदर्शक व मित्र आहेत. त्यामुळेच त्यांच्याशी सर्वांनी आपुलकीने वागावे व त्यांच्या सूचनांचे पालन करणे, हे आपले कर्तव्य आहे, असेही मत शिवराज मोरे यांनी मांडले.









