वाई / प्रतिनिधी :
वाई एमआयडीसीमधील चांदणी चौकाजवळ दोन तरुणांना तिघांनी मारहाण करत त्यामधील एकावर धारदार शस्त्राने वार केले. सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली.
अक्षय नंदकुमार निकम (वय २५, रविवार पेठ, वाई) असे जखमी तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय निकम व धीरज दगडे हे दोन मित्र एमआयडीसीमधील चांदणी चौकात एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. त्यावेळी अमन शेख, संग्राम शिर्के व ऋतिक गाढवे (सर्व रा. बोपर्डी) यांनी तेथे अक्षयचा मित्र धीरज दगडे याला हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जखमी केले. तर अक्षयवर धारदार शस्त्राने वार करून त्याला गंभीर जखमी केले. या प्रकरणात अक्षय निकम याला सातारा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून, अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र तेलतुंबडे करत आहेत.
अक्षय निकम हा मागील काही महिन्यांपूर्वी रविवार पेठ येथे झालेल्या टोळीयुद्धात सहभागी होता.त्यातून पुढे बोपर्डी येथील युवकांशी वाद झाला होता. या वादातून सोमवारी रात्री अक्षय निकम याच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याला जखीम करण्यात आले आहे. यामुळे वाई येथे टोळीयुद्ध पुन्हा डोके वर काढण्याची शक्यता नाकारता येत नाही.









