प्रतिनिधी / नागठाणे :
सातारा जिल्ह्यातील मोठी यात्रा म्हणून वर्णे- आबापुरीची यात्रा ओळखली जाते. राज्यात तसेच सातारा जिल्ह्यात दररोज कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यात्रा कालावधीत कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी वर्णे आबापुरीची यात्रा रद्द करण्यात आली आहे. यात्रेमध्ये फक्त धार्मिक कार्यक्रम पुजारी व मानकऱ्याकडून होणार आहेत. छबिना निघणार नाही. यात्रास्थळापासून १० कि. मी.परिसरात संचारबंदी असून, कोणीही या परिसरात येऊ नये असे आवाहन देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे.
मंदिर परिसरात कोणतेही दुकान, खेळण्याची दुकाने लावण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे.जिल्हादंडाधिकारी सातारा शेखर सिंह, तहसीलदार सातारा आशा होळकर यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार नुकतीच प्रशासन, देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थ यांची बैठक पार पडली. तलाठी रेखा बाबासाहेब कोळी, ग्रामसेवक सत्यवान वाघमारे, पोलीस हवालदार बाबा महाडिक यांनी मार्गदर्शन केले. देवस्थानचे चेअरमन बळवंत काळंगे, देवस्थान विश्वस्त प्रवीण पवार यांनी बैठकीत भाग घेतला.
बोरगाव पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक राजू शिंदे, किरण निकम,पोलीस कॉन्स्टेबल विजय साळुंखे, कपिल टीकोळे, देवस्थानचे विश्वस्त, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.