प्रतिनिधी / नागठाणे
पिरेवाडी (ता.सातारा) येथील ओंकार शामराव शिंदे या युवकाला शिकारीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून त्याच्याकडून पंचवीस हजार रुपये उकळणाऱ्या व या प्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल झालेला वनविभागाचा वनपाल योगेश पुनाजी गावित याला जिल्हा न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सोमवारी सायंकाळी बोरगाव पोलिसांनी त्याला अटक केली होती.
शिकारीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत ओंकार शिंदे यांच्याकडून वनविभागाचा वनपाल योगेश गावित,वनसंरक्षक महेश सोनवले,रणजित काकडे व महेश ढाणे यांनी मारहाण करून पंचवीस हजार रुपये उकळले होते. या प्रकरणी वनविभागाच्या या चारही कर्मचार्यांविरुद्ध बोरगाव पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे.यातील वनसंरक्षक महेश सोनवले याला यापूर्वीच अटक केली असून तो पोलीस कस्टडीत आहे.
सोमवारी सायंकाळी वनपाल योगेश गावित याला पोलिसांनी अटक केली. मंगळवारी त्याला जिल्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्याला तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या गुन्ह्यातील अन्य दोन वनसंरक्षक रणजित काकडे व महेश ढाणे यांचा पोलीस कसून शोध घेत आहेत.