वडूजला सार्वजनिक गणपतीच नाही
प्रतिनिधी / वडूज
कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर वडूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 17 गावांमधे एक गांव एक गणपती ही योजना राबविण्यात येणार आहे. तर चालू वर्षी वडूज शहरात एकही सार्वजनिक गणेशोत्सव होणार नसल्याचा एकमुखी निर्धार बैठकीत करण्यात आला.
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वडूज येथील सौभाग्य मंगल कार्यालयात प्रशासकीय अधिकारी व विविध मंडळाचे पदाधिकारी, प्रतिष्ठीत नागरीकांची बैठक झाली. या बैठकीत उपविभागीय पोलीस अधिकारी बाबुराव महामुनी, तहसिलदार डॉ. अर्चना पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख, मुख्याधिकारी माधव खांडेकर, माजी जि. प. सदस्य प्रा. बंडा गोडसे उपस्थित होते.
या बैठकीत कोरोना पार्श्वभूमीवर नागरीकांची गर्दी टाळण्यासंदर्भात एक गाव एक गणपती योजना राबविण्यासंदर्भात वरीष्ठ अधिकार्यांनी आव्हान केले. त्या आवाहनास प्रतिसाद देत कातरखटाव, मरडवाक, पिंपरी, कलेढोण, एनकुळ, वाकळवाडी, येरळवाडी, मांडवे, वाकेश्वर, पळसगांव, कणसेवाडी, भुरकवडी, धकटवाडी, नायकाचीवाडी, सुर्याचिवाडी, गणेशवाडी, सातेवाडी या 17 गावातील प्रमुख पदाधिकार्यांनी गावामध्ये एकच सार्वजनिक गणपती बसविण्यास सहमती दिली. या गावातील पदाधिकार्यांचा प्रशासनातर्फे सत्कार करण्यात आला. तर वडूज येथे एक गांव एक गणपती बसविण्यासंदर्भात बराच वेळ प्रदिर्घ चर्चा झाली. या चर्चेत वेगवेगळ्या मंडळाच्या पदाधिकार्यांनी आपापल्या भूमिका मांडल्या. तर प्रशासकीय अधिकार्यांनी कोरोना संकटाची भिषणता पटवून दिली. त्यानंतर सर्वानुमते चालू वर्षी सार्वजनिक गणेशोत्सव न करण्याचा निर्ण घेतला.
यावेळी प्रा. बंडा गोडसे यांनी कोरोना व आरोग्य विभागाचे काम या विषयावर सविस्तर टिप्पणी केली. तसेच कोरोना सेंटरसाठी शहराच्या मध्यवर्ती असलेले डॉ. बी. जे. काटकर हॉस्पिटलचे अधिग्रहण केल्यास दोन तालुक्यातील इतर रुग्णांची मोठ्या प्रमाणावर हेळसांड होईल. त्यामुळे त्या हॉस्पिटल ऐवजी प्रशासनाने अन्य हॉस्पिटल अथवा ग्रामीण रुग्णालयाचा पर्याय निवडावा असे आवाहन केले.