प्रतिनिधी / लोणंद
लोणंद गावच्या हदीत लोणंद ते खंडाळा जाणाऱ्या रोडवर मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या सासू सासरा सुन या तिघांना चारचाकीने चिरडले असून या झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून गाडी चालक न थांबता तेथून निघुन गेला असून या घटनेची नोंद लोणंद पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे. धडक दिलेली चारचाकी गाडी माळेगांव येथे सापडली असून त्या चालकाचा पोलिस तपास घेत आहेत.
याबाबत लोणंद पोलिस स्टेशनवरुन मिळालेली अधिक माहिती अशी की, गुरुवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास लोणंद ते खंडाळा जाणाऱ्या रोडवर नेहमीप्रमाणे शांताबाई बबन धायगुडे वय ६० वर्ष बबन नाना धायगुडे वय ७० वर्ष व सारिका भगवान धायगुडे वय ३५ वर्ष रा बिराबावस्ती लोणंद ता खंडाळा हे तिघे सासु सासरे सुन बिरोबा वस्ती लोणंद येथून खेडचा तलाव येथे चालत व्यायामाला जात असताना, लोणंद ते खंडाळा रोडला त्यांचे घरापासून साधारणपणे १५० फुट अंतरावर खेड बाजुकडे गेले असताना एक चारचाकी पांढऱ्या रंगाची कार ही खंडाळा बाजु कडून भरधाव वेगाने आली रोडचे साईडने एका पाठोपाठ चाललेल्या या सासू सासरा सुन यांना समोरुन जोराची धडक दिली व तेथून कार चालक जोरात निघुन गेला.
त्यामध्ये हे तिघे सासू सासरे सुन गंभीर जखमी झाले होते. त्यांना तात्काळ राहूल शेळके अमित घाडगे महेद्र माने यांनी खाजगी हॉस्पीटल लोणंद येथे उपचाराकरता नेले असताना खाजगी हॉस्पीटलच्या डॉक्टरांनी शांताबाई धायगुडे व बबन धायगुडे हे अपघातामध्ये गंभीर जखमा झाल्यामुळे मयत झाल्याचे सांगितले सारिका धायगुडे ही गंभीर जखमी असल्यामुळे तिला उपचारा कामी पुणे येथे नेत असताना त्याही रस्त्यात मयत झाल्या आहेत अशी खबर रामदास गोपाळ शेळके यांनी पोलिस स्टेशनला दिली असून या सासू सासरे सुन एकाच कुटुंबातील या तिघांच्या अपघाती जाण्याने लोणंदमध्ये हळहळ व्यक्त होत होती. घटनास्थळी पांढरे रंगाचा चारचाकी कारचा बंपर व त्यावर एम एच २० बी एन ९४२८ असा नंबर लिहिलेला बंपर तुटून पडला असूनती चारचाकी कार माळेगांव येथून ताब्यात घेतली. कार चालक फरार असून या कार चालका विरोधात लोणंद पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा अधिक तपास लोणंदचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष चौधरी व महेश सपकाळ हे करीत आहेत .









