सातारा /प्रतिनिधी
लॉकडाऊनमुळे सर्व व्यवसाय बंद पडले आहेत. फक्त भाजीपाल्याच्या व्यवसायाला सध्या तेजी असून विना परवाना गाडीतून भाजीपाला विकणारे गल्लोगल्ली दिसत आहेत. सातारा पालिकेकडून रस्त्यावर विनाकारण गर्दी करणाऱ्या मंडईवर कारवाई केली जात आहे. पालिकेची परवानगी घेऊन किती भाजी विक्रेते व्यवसाय करतात हा संशोधनाचा विषय बनला आहे. सध्या भाजी शेतात महाग नाही तर ग्राहकांच्या दारात चौपट, पाचपट ते सहा पट दराने विक्री केली जात आहे. वांगी 80 रुपयाला किलो आणि कोथिंबीरची जुडी 40 ला मिळू लागली आहे.
कोरोनामुळे लॉकडाऊन आणि लॉकडाऊनमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.त्यापैकी एक म्हणजे बहुतांशी सर्व व्यवसाय बंद आहेत. शहरातील अनेक व्यापाऱ्यांनी आपले दुकान बंद असल्याने दुकान गाळ्यांचे भाडे, लाईट बिल देता येऊ शकत नसल्याने गाळाच बंद केला आहे.तर काहींनी यामध्ये भाजी विक्रीचा व्यवसाय सध्या तेजीत असल्याने अनेकांनी तो व्यवसाय सूरु केला आहे.कोरोनाला किती काळ घाबरायचे किती दिवस घरात रहायचे म्हणून शेतात जाऊन शेतकऱ्यांकडून भाजीपाला थेट खरेदी करून तो शहरात गल्लोगल्ली जाऊन विकला जाऊ लागला आहे. भाजी विक्रेत्यानी भाजीपाल्याचे दर मनाला येईल तसे वाढवले आहेत. 80 रुपयांना वांगी किलो, 40 रुपयांना कोथिंबीरची जुडी, 30 रुपयांना मेथीची पेंडी, बटाटा, कांदा यांचे तर दर वेगळेच लागलेले आहेत.भाजी विक्रीच्या व्यवसायात अनेकांनी चांदी केली आहे. लोक ही गरज म्हणून वाटेल त्या किमतीला भाजी खरेदी करताना दिसत आहेत.
पालिकेच्या पथकाकडून कारवाई
सातारा पालिकेच्या पथकाने बुधवारी सकाळी रस्त्यावर बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांवर कारवाई केली. मुख्याधिकारी रंजना गगे यांच्या सूचनेनुसार अतिक्रमण विभागाचे प्रशांत निकम यांच्या पथकाने कारवाई केली. अतिक्रमण करणाऱ्यांना हटवण्यात आले.








