सातारा / प्रतिनिधी :
रोटरी क्लब ऑफ वाईतर्फे सातारा शहरातील माऊली ब्लड बँकेला ग्लोबल ग्रॅन्टच्या माध्यमातून 37 लाख रुपयांचे ब्लड बँक इक्विपमेंट्स देण्यात आले. यामध्ये रेफ्रिजरेटेड सेंट्रीफ्यूज, डिप फ्रिजर, ब्लड बँक रेफ्रिजरेटर, प्लेटलेट इन्क्युबेटर एजिटेटर, ब्लड कलेक्शन मॉनिटर्स, पोर्टेबल ब्लड डोनर लाऊंजेस, कॉऊचेस फॉर इनहाऊस ब्लड डोनेशन, पोर्टेबल ट्यूब सिलर अशा मशिनरीचा समावेश आहे. ही सर्व मशिनरी अद्ययावत, परिपूर्ण व सुसज्ज आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन रोटरी इंटरनॅशनल डायरेक्टर रो.डॉ. महेश कोटबागी यांच्या हस्ते, तसेच पी.डी.जी. रो. इस्माईल पटेल यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले. या कार्यक्रमासाठी आय.एम.ए.चे सर्व डॉक्टर्स, सातारा जिल्ह्यातील सर्व रोटरी क्लबचे प्रेसिडेंट, सेक्रेटरी व ऑफिसर्स तसेच रोटरी क्लब मधील सर्व क्लब मेंबर्स सहभागी झाले होते. प्रमुख पाहुणे RIDE डॉ. महेश कोटबागी यांनी प्रत्येक क्लबने अशा प्रकारच्या ग्लोबल ग्रँट कराव्यात असे आवाहन केले, तसेच माऊली ब्लड बँक इक्विपमेंट ग्रँटबद्दल कौतुकोद्गार काढले.
या कार्यक्रमावेळी बोलताना सातारा जिल्ह्यातील प्रत्येक क्लब’च्या तालुक्याच्या ठिकाणी सॅटॅलाइट ब्लड युनिट करण्याचे आश्वासन माऊली ब्लड बँकेचे अध्यक्ष डॉ. गिरीश पेंढारकर यांनी दिले आहे. त्यामुळे खेडेगावाहून अथवा तालुक्यातून सातारा या जिल्हा ठिकाणी रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना धावपळ करावी लागते ती कमी होणार असून, त्यान्वये बऱ्याच रुग्णांचे प्राण वाचवण्यास मदत होणार आहे.
या प्रोजेक्टच्या प्रकल्प प्रमुख स्वाती हेरकळ यांनी या प्रकल्पाबद्दल सविस्तर माहिती दिली. प्रेसिडेंट अजित क्षीरसागर यांनी सर्वांचे स्वागत करून रोटरी क्लब ऑफ वाईच्या उपक्रमाबद्दल माहिती दिली. रो. डॉ. मिलिंद शहा यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. सेक्रेटरी डॉ. जितेंद्र पाठक यांनी सूत्र संचालन केले.









