साताराः रेशनिंग कार्डला आधार लिंक करण्याची मुदत 31 जानेवारीपर्यंत आहे. मात्र, कुटूंबाना आधार लिंक करताना अडचणी निर्माण झाल्या आहेत. कुटुंबामध्ये काही सदस्यांची आधार कार्ड नसल्यामुळे, ते रेशनिंग कार्डला जोडता येत नाहीत. तसेच दुकानदारांनीही 31 जानेवारीला आधार कार्ड लिंक न केल्यास धान्य मिळणार नाही. अशा प्रकारचा सज्जड दम देण्यास सुरुवात केली आहे.
कोविडच्या काळामध्ये अनेकांना याबाबतची माहिती नसल्यामुळे अनेक कार्डधारक हे रेशनिंग पासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे लोक वंचित राहू नये, म्हणून आणि प्रत्येकाला थोडा वेळ मिळावा, म्हणून आधार लिंक करण्याची मुदत सरकारने वाढवून द्यावी. अन्यथा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने प्रत्येक तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा पक्षाचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांनी दिला. यासंदर्भातील निवेदन जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना देण्यात आले.
यावेळी जनरल कामगारचे मदन खकंकाळ सातारा तालुका अध्यक्ष दिपक गाडे, युवक अध्यक्ष विकास बैले, शहराध्यक्ष जयवंत कांबळे, सोलापूर तालुका अध्यक्ष योगेश माने सावंत आदी उपस्थित होते.