शाहूपुरी : कोरोना काळात एस.टी. बस वाहतूक ठप्प झाल्यानंतर रिक्षाला मान्यता मिळाली होती. एका रिक्षात दोनच प्रवासी बसवावेत, अशी अट होती.त्याकाळात रिक्षा चालकांनी दुप्पट भाडे आकारणी केली. आता तो काळ मागे सरला आहे, आता रिक्षात ओव्हरफुल्ल प्रवासी बसवले जात आहेत. त्यांचे भाडे मात्र, कमी झालेले नाही. दुप्पट भाडे आकारून रिक्षाचालक लूटत आहेत.
सातारा शहरात रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात रिक्षा वाहतूक आहे. कोरोना संकटात तीन महिने रिक्षा बंद होत्या. चालक, मालकांच्या चुली पेटायचे अवघडझाले होते. अनेकांच्या बँकेच्या कर्जाचे हप्ते थांबले होते. तो काळ आता सरला आहे. मंदिरे व यात्रा जत्रा वगळता सर्व बाजारपेठ व जिल्हा सुरू आहे. सार्वजनिक वाहतूकही सुरू करण्यात आली आहे. यामध्ये रिक्षा चालकांनाही परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाकाळात केवळ दोनच प्रवाशांची वाहतूक करण्याचे निर्बंध शासनाने घातले होते. त्यामुळे रिक्षाचालकांनी भाडे दुप्पट केले होते. त्यावेळी अडचणीची परिस्थिती असल्याने नागरिकांनीही त्याला सहकार्य केले होते.
कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली तरी भाडेवाढ काही केल्या कमी झालेली नाही. रिक्षा ओव्हरफुल्लभरून वाहतूक केली जात आहे. एका रिक्षामध्ये चार ते पाच प्रवासी बसवून वाहतूक होत आहे. अशी परिस्थिती असेल तर जादा भाडे आकारणी कशासाठी? असा सवाल केला जात आहे. या प्रकरणीप्रवासी हक्क संघटना, पोलीस आणि रिक्षा चालक-मालक संघटनांनी तातडीने विचार करून धोरण ठरवणे गरजेचे आहे. सामान्य प्रवाशांची लूट किती काळ चालणार? असा संताप नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.









