पोलिसांनाच दमदाटी;सरकारी कामात अडथळा आणल्याची तक्रार
प्रतिनिधी / सातारा
कोरोना संसर्ग वाढून नये म्हणून जिल्हाधिकारी यांनी संचारबंदीचा आदेश दिल्याने लोकांना विनाकारण बाहेर फिरण्यास मज्जवा करण्यात आला आहे. मात्र, या आदेशाच भंग करून जकातवाडी परिसरातून मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महेश विष्णू रसाळ (रा. शुक्रवार पेठ,सातारा) याच्यावर सातारा तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे. दरम्यान संबंधित युवकाने पोलिसांशी हुज्जत घालून दमदाटी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. याप्रकरणी पोलीस हवालदार गजानन फडतरे यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्ह्यात करोनाचा संसर्ग वाढत असल्याने जिल्हाधिकारी यांनी संचारबंदीचा आदेश काढला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोणत्याही नागरिकाला विनाकारण घराबाहेर फिरत येत नाही. तसेच या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी पोलीस यंत्रणेला आदेश दिले आहेत. त्यानुसार शहर व परिसरात विनाकारण फिरणारे, मॉर्निंग वॉक करणाऱ्यांवर, विनामास्क फिरणाऱ्यांवर पोलीस कारवाई करत आहेत.
दि.28 रोजी सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी हे कर्मचाऱ्यांसह बोगदा ते जकातवाडी परिसरात गस्त घालत असताना रसाळ हा त्यांना रस्त्यावरून जातान दिसला. त्यावेळी दळवी यांनी त्याला बाहेर पडण्याचे कारण विचारले असता, त्याने आपण मॉर्निंग वॉकसाठी आल्याचे सांगितल्याने दळवी यांनी त्याच्यावर कारवाई करण्याच्या सुचना कर्मचाऱ्यांना दिल्या. आपल्यावर कारवाई होणार या भितीने बिथरलेल्या रसाळ याने “”आज तुमचा दिवस आहे, उद्या माझा असेल” असे म्हणत कारवाई टाळण्यासाठी पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करून साथ रोग कायद्यासह सरकारी काम करत असताना उद्धट वर्तन केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.