प्रतिनिधी/नागठाणे
बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात मूकबधीर वृद्धेवर युवकाने बलात्कार केल्याची घृणास्पद घटना बुधवारी (दि.4) दुपारी घडली. काल, गुरुवारी (दि.5) या घटनेची माहिती बोरगाव पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ संशयित युवकास अटक केली. सूरज दत्तात्रेय पवार (वय.३०,रा.मांडवे,ता.सातारा) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नागठाणे परिसरातील डोंगरपायथ्याशी वसलेल्या एका गावातील वृद्ध मूकबधीर महिलेवर अत्याचार झाल्याची माहिती सपोनि डॉ.सागर वाघ यांना गुरुवारी मिळाली. यावेळी पोलिसांनी तात्काळ मूकबधीर व्यक्तींची भाषा जाणणाऱ्या एका शिक्षिकेला सोबत घेऊन घटनास्थळ गाठले. ही पीडित मूकबधीर वृद्ध महिला भाऊ व आईसोबत राहते. बुधवारी दुपारी ही महिला तिच्या घरातील पडवीत झोपली असता सूरज पवार याने तिच्यावर अत्याचार केला अशी माहिती या पीडित वृद्धेने दिली. वृद्धेने यावेळी आरडाओरडा केला असता शेजारील महिला मदतीसाठी धावत आल्याचे पाहून संशयिताने तेथून पलायन केले. या घटनेची फिर्याद काल, गुरुवारी रात्री बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून रात्री उशिरा पोलिसांनी संशयित सूरज याला अटक केली. या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी आंचल दलाल करत आहेत.
Previous Articleमंत्री गोविंद गावडेंना निवेदन
Next Article गरीबांसाठी फोंडय़ात ‘फूड बँक’ सुरु









