प्रतिनिधी/उंब्रज
आशियाई महामार्गावर बेलवडे हवेली (ता. कराड) गावच्या हद्दीत ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने अचानक पेट घेतल्याने ट्रक्टर जळून लाखों रुपयांचे नुकसान झाले. आज, रविवारी सायंकाळच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर महामार्गावर काहीकाळ थरार निर्माण झाला होता. दरम्यान यावेळी वाऱ्याचा वेग जोरात असल्याने क्षणार्धात आग भडकली. घटनेची माहिती मिळताच तळबीड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच कराड अग्निशामक दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आज विझवण्यात आली मात्र तोपर्यंत ट्रॅक्टर जळून खाक झाला होता.
याबाबत अधिक माहिती अशी की, महामार्गावर बेलवडे हवेली गावच्या हद्दीत कराड ते उंब्रज दिशेने ऊस भरून ट्रॅक्टर कारखान्याकडे निघाला होता. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास सदरचा ट्रॅक्टर बेलवडे गावच्या हद्दीत आल्यानंतर ट्रॅक्टरने अचानक पेट घेतला. त्यामुळे चालकांची भंबेरी उडाली. चालक हरिश्चंद्र केशव काशिद (रा. बीड) यांनी ट्रॅक्टर थांबून बाहेर उडी घेतली. वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने ट्रॅक्टरने जोराचा पेट घेतला त्यामुळे महामार्गावर ज्वाळा दिसत होत्या.
दरम्यान सदर घटनेची माहिती मिळताच तळबीड पोलिसांच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. कराड अग्निशामक दलाचा बंब बोलण्यात आला. तसेच काहीकाळ वाहतूक बंद करण्यात आली.त्यानंतर ही आग विझवण्यात आली. मात्र सदर आगीत ट्रॅक्टर खाक झाल्याने लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे. सदर घटनेचा पंचनामा करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत तळबीड पोलिसांकडून सुरू होते.









