बेकायदेशीर कोरोना रक्त चाचणी प्रकरण जिल्ह्याचा आरोग्य विभाग हादरला
नवारस्ता / प्रतिनिधी
कोविड रक्त चाचणी करण्याची कोणतीही कायदेशीर परवानगी नसताना पाटण तालुक्यातील मल्हारपेठ येथील लॅब मालक आणि डॉक्टर या दोघांनी संगनमताने बेकायदेशीर व चुकीच्या पद्धतीची कोविड रक्त चाचण्या करून सर्वसामान्य रुग्णांना लुबाडल्याची तक्रार मल्हारपेठ पोलीस ठाण्यात नोंद झाली होती. त्यानंतर मल्हारपेठ पोलीसानी तात्काळ कार्यवाही करून संबंधित लॅब मालक आणि डॉक्टर यांच्याविरोधात गुन्हा नोंद केला असून लॅब मालकाला अटक करण्यात आली आहे.
मात्र या प्रकरणातील डॉक्टर अद्याप फरार असल्याची माहिती मल्हारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी अजित पाटील यांनी दिली. दरम्यान लॅब मधील बेकायदेशीर साहित्य पोलिसांनी जप्त केले असून लॅब सील केली असल्याची माहिती ही पोलिसांनी दिली. या घटनेने सातारा जिल्ह्यातील आरोग्य विभाग चांगलाच हादरला आहे.










