नागरिकांची पळापळ ; परिसरातील वीज पुरवठा खंडित
सातारा : भुईंज (ता.वाई) येथे आज सायंकाळच्या सुमारास पोलीस ठाण्याच्यानजिक असणार्या नारळाच्या झाडावर वीज पडल्याची घटना घडली. नारळाच्या झाडाने पेट घेतल्याचे लक्षात येताच नागरिकांची मात्र चांगलीच पळापळ झाली. आग आटोक्यात येईपर्यंत परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.
याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी, भुईंज (ता.वाई) येथे आज दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार झाले होते. वार्यानेही आपला रोख बदलला होता. साधारण 4 वाजण्याच्या सुमारास भुईंज पोलीस ठाण्याच्या नजिक असणार्या एका नारळाच्या झाडावर वीज पडली. क्षणात झाडाने पेट घेतल्यानंतर घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली. पोलिसही दाखल झाले. सर्वप्रथम काय खबरदारी घ्यायची, याची माहिती पोलिसांनी दिल्यानंतर परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला. त्यानंतर प्रथम झाडावर लागलेली आग विझविण्याचे काम हाती घेण्यात आले.
सुदैवाने पोलिस ठाण्याच्या शेजारील झाडावर वीज पडली हीच वीज पोलिस ठाण्याच्या इमारतीवर पडली असती तर फार मोठी दुर्घटना घडली असती, अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती.









