ना. बाळासाहेब पाटील व खा. श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून रस्ता मंजुर
प्रतिनिधी / वाठार किरोली
तारगाव, किरोली व टकले (ता. कोरेगाव) या रस्त्यासाठी पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील व खा. श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून निधी उपलब्ध झाला आहे. पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून हा रस्ता पुर्ण करण्यात येणार आहे. यामुळे या परीसरातील १५०० एकर शेतजमिनीला फायदा होणार आहे. तारगाव, किरोली व टकले या गावांना जोडणाऱ्या ब्रिटीशकालीन रस्ता होता. परंतु रेल्वे लाईनचे काम झाल्यानंतर गेल्या ७० वर्षात या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी मिळाला नाही. त्यामुळे या परीसरातील ऊस व शेतमाल वाहतुकीची खुप मोठी अडचण निर्माण झाली होती. हा रस्ता दुरुस्त व्हावा ही परीसरातील शेतकऱ्यांची मागणी होती. तारगावचे सामाजिक कार्यकर्ते विकास थोरात यांनी रस्त्यासाठी लोकप्रतिनिधी पालकमंत्री बाळासाहेब पाटील व खा. श्रीनिवास पाटील यांना प्रस्ताव दिला होता. खा. श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून या रस्त्यासाठी निधी मिळवून दिला आहे.
या रस्त्याच्या मोजणीची कार्यवाही पुर्ण झाली असून शेतकऱ्यांना कायम अडचणीच्या ठरणाऱ्या या रस्त्याला मोकळा श्वास घेता येणार आहे. त्यामुळे रेल्वेलाईन खालील तिन्ही गावचे अंदाजे १५०० एकर बागायती क्षेत्र असणाऱ्या तारगाव ते रहिमतपूर हद्दितीत शेतकऱ्यांचा फार अवघड प्रश्न लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने सुटणार आहे. शेतकऱ्यांचा ७० वर्षांचा किचकट व अतिशय अडचणीचा विषय मिटवला या बद्दल तारगाव, किरोली, टकले व रहिमतपूर परिसरातील इतर गावातील शेतमाल व ऊस वहातूक करणाऱ्या सर्व गावच्या ग्रामस्थांनी दोन्ही मान्यवरांचे आभार मानले आहेत. रस्त्याच्या मोजणीचा शुभारंभ तारगावचे विकास थोरात यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी दिलीप देशमुख, सुरेश थोरात, दिलीप मोरे, अभिजीत घोरपडे, राजकुमार मोरे तसेच टकले गावचे सरपंच प्रशांत घाडगे, उपसरपंच खुटेकर, जयहनुमान घाडगे, राजेश घाडगे,किरोली गावचे संजय चव्हाण, रामभाऊ चव्हाण व इतर सहकारी उपस्थित होते.
भारतासारख्या संमिश्र अर्थव्यवस्था असणाऱ्या खंडप्राय देशात लोकप्रतिनिधींनी ब्रिटीशकालीन नकाशावरील रस्ते शासनामार्फत जलद गतीने खुले करून दिले तर शेतमाल कोणत्याही ऋतूमध्ये बाजारपेठेपर्यंत जाऊन महागाई नियंत्रणात राहिल व शेतकऱ्यांना चार पैसे जादा मिळतील.