प्रतिनिधी / नागठाणे
खाजगी आरामबसमधून अवैधरित्या वहातुक होत असलेले सोन्या-चांदीचे दागिने बोरगाव पोलिसांनी छापा टाकून ताब्यात घेतले.शनिवारी पहाटे नागठाणे (ता.सातारा) येथे महामार्गावर ही कारवाई कारवाई करण्यात आली.पोलिसांनी यावेळी ५९१ किलो चांदी व १९ तोळे सोने जप्त केले असून याची किंमत सुमारे ३.६४ कोटी रुपये होत आहे.
याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,कोल्हापूर येथून कार्तिक ट्रॅव्हल्स या खाजगी आरामबसमधून अवैधरित्या चांदीची वहातूक होत असल्याची माहिती बोरगावचे सपोनि डॉ.सागर वाघ यांना शुक्रवारी रात्री मिळाली.यावेळी त्यांनी महामार्गावरील नागठाणे येथे चौकात नाकाबंदी केली.शनिवारी पहाटे १.३० वाजण्याच्या सुमारास त्यांनी सदर आरामबस अडवली.
गाडीची झडती घेतली असता त्यांना आरामबसच्या डिकीत काही संशयास्पद बैगा व पोती आढळून आल्या.त्यांची तपासणी केली असता त्यामध्ये सोने व चांदीचे दागिने असल्याचे आढळून आले.या दागिन्यांसंदर्भात बसचालकाकडे कोणतीही पावती आढळून आली नाही.त्यांच्याकडे अधिक चौकशी करता ही पोती सोनसिंग मुरारीसिंग परमार,अमोल प्रल्हाद भोसले,मनोजकुमार श्रीमोनसिंग परमार (सर्व रा.कोल्हापूर) यांचा असल्याचे सांगितले.
शनिवारी दिवसभर पोलीस या दागिन्यांचे मूल्यांकन करत होते.अखेर रात्री उशिरा हे मूल्यांकन पार पडले.पोलिसांनी ५९१ किलो वजनाचे सुमारे ३,५४,७६,८०० रुपये किमतीचे चांदीचे विविध दागिने,१९ तोळे सोन्याचे सुमारे ९,३७,३०० रुपये किमतीचे दागिने असा सुमारे ३,६४,१४,१०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.सहाय्यक पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी पोलीस ठाण्यात भेट देऊन तापासासदर्भात मार्गदर्शन केले.कारवाईत सपोनि डॉ.सागर वाघ,हवालदार मनोहर सुर्वे,सुनील जाधव,किरण निकम,विजय साळुंखे,विशाल जाधव,प्रकाश वाघ,राहुल भोये,उत्तम गायकवाड व चालक पवार यांनी सहभाग घेतला.
Previous Articleकोगे येथे नदीकाठी मगरीचे दर्शन
Next Article रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे 22 नवे रुग्ण









