प्रतिनिधी / नागठाणे
सध्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा ज्वर गावा-गावात शिगेला पोहचला असतानाच अनेक गावांत निवडणूक बिनविरोध होण्यासाठीही हालचाली जोरात सुरू असल्याचे चित्र आहे. सातारा-जावळी विधानसभा मतदार संघातील बोरगाव (ता.सातारा) येथील ग्रामपंचायतीची निवडणूक लागली असून ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत.
बोरगाव ग्रामपंचायत ही सातारा-जावळी विधानसभा मतदार संघातील राजकीयदृष्ट्या महत्वाची ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. यापूर्वी या गावच्या झालेल्या निवडणुका अत्यंत चुरशीच्या झाल्या होत्या. येथील अजिंक्य पैनल व रयत पैनल या दोन पारंपारिक पैनेलमध्येच या निवडणुका होत होत्या.त्यामुळे या गावच्या निवडणुकीकडे भागातील जनतेचे नेहमीच लक्ष वेधले जात होते.
मात्र यावेळी ही ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर धोका टाळण्याबरोबरच निवडणुकीत होणारा भरमसाठ खर्च वाचविण्यासाठी व गावाच्या विकासाच्या दृष्टिकोन डोळ्यासमोर घेऊन ही बिनविरोधची संकल्पना पुढे आली. यासाठी बोरगावच्या जेष्ठ नागरिकांसह दोन्ही पैनेलचे जेष्ठ पुढारी, कार्यकर्ते व गावातील युवा वर्गही यामध्ये सामील झाला आहे. ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी ग्रामस्थांच्या बैठकाही सुरू असून त्याला सकारात्मक प्रतिसादही मिळत आहे. त्यामुळे लवकरच बोरगावचे ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होईल अशी आशा येथील ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.
बोरगाव ग्रामपंचायत सदस्य संख्या- ११
वार्डनिहाय आरक्षण:-
१- रामेश्वर वार्ड- सदस्यसंख्या-३
नागरिकांचा मागास प्रवर्ग (पुरुष)-१
सर्वसाधारण (महिला)-१,सर्वसाधारण-१
२-बोरजाई वार्ड-सदस्यसंख्या-३
अनुसूचित जाती (महिला)-१,नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)-१,सर्वसाधारण-१
३-भैरवनाथ वार्ड-सदस्यसंख्या-२
सर्वसाधारण(महिला)-१,सर्वसाधारण-१
४- रामभाऊ वार्ड-सदस्यसंख्या-३
नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)-१,सर्वसाधारण (महिला)-१,सर्वसाधारण-१









