प्रतिनिधी / सातारा :
कोरोना काळाचा गैरफायदा घेऊन सातारा जिल्ह्यात 15 ते 40 हजारात नर्सिंग कोर्सचे बोगस प्रमाणपत्र वाटणाऱ्या टोळीवर गुन्हे दाखल करावेत, यासह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपाइंच्या गवई गटाने निदर्शने केली. जिल्हाध्यक्ष संजय गाडे यांच्या नेतृत्वाखाली मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी चंद्रकांत कांबळे, भिकाजी सपकाळ, सुहास मोरे, दीपक जाधव, दीपक कदम, रेखा तपासे, कृष्णांत मोरे आदी उपस्थित होते.
गाडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना काळाचा गैरफायदा घेवून जिल्ह्यात 15 ते 40 हजारात नर्सिंग कोर्सचे बोगस प्रमाणपत्र वाटणाऱ्या टोळीवर गुन्हे दाखल करण्यात यावेत. कोयना धरण निर्मितीपूर्वी व नंतर पूर्नवसन केलेल्या धरणग्रस्तांना आजअखेर पूर्ण नागरी सुविधा मिळाल्या नसल्याने, तसेच काहींना बदली जमीन मिळाली नसल्याने नियमानुसार धरणग्रस्तांची जमीन अधिगृहण केलेल्या तारखेपासून आजपर्यंत सर्व निर्वाह भत्ते तात्काळ देण्यात यावेत, एजंटाच्या मध्यस्थीने कार्यालयीन कर्मचाऱ्यांना हाताशी धरुन पोट खातेदारांच्या नावे ज्यादा प्लॉट घेतलेल्या खातेदारांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करुन प्लॉट काढून घेण्यात यावेत, गौंड आदीवासींना जातीचे दाखले देण्यात यावेत, आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.









