प्रतिनिधी / नागठाणे
कृषि विज्ञान केंद्र, बोरगांव (ता.सातारा) आणि आत्मा, सातारा यांचे संयुक्त विद्यमानाने शेतीमधील यांत्रिकीकरण या विषयावर दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन कृषि विज्ञान केंद्र, बोरगांव येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषि विज्ञान केंद्र, बोरगांवचे कार्यक्रम समन्वयक प्रा. मोहन शिर्के तर प्रमुख पाहुणे प्रकल्प उपसंचालक आत्मा, सातारा श्री. अशोक देसाई हे होते.
यावेळी अशोक देसाई यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना बी.बी.एफ. टोकन यंत्राद्वारे पेरणी करणे ही काळाची गरज असल्याचे नमुद केले. सदर प्रशिक्षणादरम्यान उपस्थित शेतकऱ्यांना शेतीमधील यांत्रिकीकरणाचे महत्व आणि मृद व जलसंधारण याविषयी श्रीमती काजल जाधव यांनी मार्गदर्शन केले.
शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतावर बी.बी.एफ. टोकन यंत्राच्या सहाय्याने पेरणी करतांना योग्य पध्दती तसेच ट्रॅक्टर चालकांना प्रत्यक्ष शेतावर येणाऱ्या अडचणी यासंबंधी मार्गदर्शन विपीन सुळे यांनी केले. सदर कार्यक्रमास आत्माचे तंत्रज्ञ व्यवस्थापक एस. आर. साबळे, कृषी पर्यवेक्षक आर. एस. साबळे, व कृषी सहाय्यक धनाजी फडतरे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना शेतीमधील यांत्रिकीकरणादरम्यान येणाऱ्या विविध अडचणी व शंकेचे निरसन केले.
सदर प्रशिक्षणादरम्यान उपस्थितांना बी.बी.एफ. टोकन यंत्राच्या वापराकरीता ट्रॅक्टर निवड व आवश्यक समायोजन, ट्रॅक रुंदी समायोजन अशा प्रकारे विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षणाचे सुत्रसंचालन विषय विशेतज्ञ डॉ. महेश बाबर यांनी केले तर डॉ. कल्याण बाबर यांनी आभार मानले. या प्रशिक्षणास डॉ. स्वाती गुर्वे, विषय विशेषज्ञ, श्रीमती विजया जाधव, श्रीमती दया कांबळे आणि अधिकारी व कर्मचारी उपस्थितीत होते. प्रशिक्षणास कृषि विज्ञान केंद्र, बोरगांव येथील जयवंत मोरे, शरद काळे,आशुतोष गायकवाड, बजरंग कदम,संजय बनसोडे, रोहित गायकवाड यांचे सहकार्य लाभले.









