प्रतिनिधी / वाई
वाई शहर व परिसरात सतत मारामारी करून दहशत माजवणाऱ्या तीन जणांना वाई पोलिसांनी तीन महिन्यांसाठी चार तालुक्यातून तडीपार केले आहे. तडीपार झालेल्यामध्ये बावधन येथील दोन तर वाईतील एकाचा समावेश आहे, अशी माहिती वाई पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाई परिसरात मारामारी करणारे तिघेजण तीन महीने तडीपार करण्यात आले आहेत. त्यामध्ये प्रशांत राजेंद्र कदम (वय-२३ वर्षे, रा. बावधन, ता. वाई,जि. सातारा), अनिकेत सुखदेव चव्हाण (वय २२ वर्षे, रा.बावधन), विजय विश्वास जाधव, (वय-२१ वर्ष, रा. सोनगिरवाडी वाई) यांचा समावेश आहे. यांची एक टोळी तयार झाली होती त्यांनी वाई परिसरात गर्दीमारामारी करुन दुखापत, शिवीगाळ, दमदाटी करणे, असे गुन्हे केलेले आहेत. त्यांना पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ५५ अन्वये सातारा, वाई, महाबळेश्वर, खंडाळा, तालका हद्दीतून तीन महिन्याकरीता हद्दपार केले बाबतचा आदेश केला आहे.
या टोळीतल्यांना वेळोवेळी सुधारण्याची संधी देवूनही त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नव्हती. त्यांचा सर्वसामान्य जनतेस उपद्रव होत होता. जनतेमधून त्यांच्यावर कडक कारवाई करण्या करीता मागणी होत होती. त्यामुळे त्यांचेकडून सातारा जिल्हा हद्दीत हिंसक घटना घडून भिती व दहशतीचे वातावरण निर्माण होवू नये म्हणून हद्दपार करण्याबाबत वाई पोलीस ठाण्याकडून प्रस्ताव सादर केला होता. या हद्दपार प्रस्तावांची सुनावणी होवून पोलीस अधीक्षक यांनी करून हद्दपार आदेश केलेले आहेत. या कारवाईचे सर्व स्थरातून समाधान व्यक्त होत आहे.









