सातारा / प्रतिनिधी :
सातारा नगरपालिकेच्या स्विकृत नगरसेवक पदासाठी सातारा विकास आघाडीकडून आज खा. छ. उदयनराजे भोसले यांचे कार्यकर्ते बाळासाहेब ढेकणे यांनी आपला उमेदवारी अर्ज प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांच्याकडे दाखल केला. साविआकडून या पदासाठी एकमेव उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्यामुळे आता केवळ ढेकणे यांच्या निवडीच्या घोषणेची औपचारिकता बाकी राहिली आहे.
२०१६ साली झालेल्या सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीत सातारा विकास आघाडीने २२, नगर विकास आघाडीने १२ तर भारतीय जनता पार्टीने सहा जागांवर विजय प्राप्त केला होता. सातारा विकास आघाडीची नगरपालिकेत सत्ता स्थापन झाल्यानंतर त्यांच्या वाट्याला दोन, नगर विकास आघाडीला एक आणि भारतीय जनता पार्टीला एक स्वीकृत नगरसेवक पद आले होते. सातारा विकास आघाडीकडून एका स्विकृत नगरसेवक पदावर पक्षप्रतोद एडवोकेट दत्ता बनकर यांची वर्णी लावली होती. दुसऱ्या जागेवर प्रशांत अहिरराव यांना संधी दिली होती. अहिरराव यांचा कार्यकाल जुलै २०२० मध्ये संपल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे सुपूर्त केला होता. पुणे पदवीधर आणि शिक्षक संघाची निवडणूक लागल्यामुळे आचारसंहिता लागू झाली होती. त्यामुळे या जागेवर निवडणूक घेता आली नाही. आचारसंहिता संपताच जिल्हाधिकारी यांनी सातारा नगरपालिकेतील स्विकृत नगरसेवक पदासाठी निवडणूक कार्यक्रम घोषित केला होता. त्यानुसार सातारा विकास आघाडीकडून ढेकणे यांनी सातारा विकास आघाडीकडून स्वीकृत नगरसेवक पदासाठी प्रांताधिकारी मुल्ला यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
काही महिन्यांपूर्वी राज्य शासनाने सातारा शहराची जाहीर केलेली हद्दवाढ लक्षात घेता खा. छ. उदयनराजे भोसले यांनी विकासाचा समतोल रहावा, यासाठी ढेकणे यांना स्वीकृत नगरसेवक पदासाठी संधी दिल्याचे बोलले जात आहे.









