प्रतिनिधी / बलवडी
विजयासाठी दोघेही त्वेषाने लढत होते. डाव प्रतिडावामुळे जय पराजयाचाचे पारडे वर-खाली होत असल्याने उत्कंठा शिगेली पोहचली होती. मात्र अखेरीस सारंग पवार (बलवडी) विरुद्ध अर्णव गायकवाड (मुंबई) यांच्यातील बलवडीच्या मैदानातील रंगतदार कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली. उपस्थित मोजक्या कुस्ती शौकिनांनी टाळ्यांच्या गजरात याप्रेक्षणीय लढतीचे कौतुक केले.
बातमी वाचून दचकला असाल पण हे खरे आहे. दरवर्षी श्रावण महिन्यातील शेवटच्या मंगळवारी बलवडी ता खानापूर येथे भवानी देवीच्या यात्रेनिमित्त कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात येते. गेल्या 70 वर्षापासून अव्याहतपणे ग्रामस्थांनी ही मैदानाची परंपरा जपली आहे. लोकाश्रयातून रांगड्या मर्दानी खेळाची परंपरा जपण्यासाठी मैदानात ग्रामस्थांच्या वतीने लाखो रुपयांची बक्षीसे देण्यात येतात.त्यामुळे या कुस्ती मैदानाला मोठा वारसा लाभला आहे. शिवाय श्रावण महिन्यात महाराष्ट्रात होणाऱ्या मोठ्या कुस्ती मैदानात बलवडीच्या मैदानाची गणना होते.
दरवर्षी पश्चिम महाराष्ट्रात खास करून सांगली सातारा जिल्ह्यात श्रावण महिन्यात अनेक कुस्ती मैदाने होतात याला शेकडो वर्षाची परंपरा आहे. मोठ्या नैसर्गिक आपत्तीत देखील लोकांनी जिद्दीने मैदाने करून परंपरा अबाधित राखली होती. मात्र यंदा कोरोना महामारीचे मोठे संकट उभे राहिल्याने यात्रा जत्रा आणि कुस्ती मैदानावर बंदी घालण्यात आली आहे. गेल्या पाच महिन्यापासून कुठेही मैदानात शड्डू घुमला नाही. त्यामुळे मोठी परंपरा लाभलेली ही मैदाने यंदा प्रशासनाच्या आदेशानुसार रद्द करण्यात आली.
कोरोनामुळे मैदान होणार नाही यामुळे बलवडीच्या मैदानात हिरहिरीने काम करणारे संपत पवार अस्वस्थ होते. यंदा मैदान झाले नाही तर परंपरा खंडित होईल यामुळे बैचेन झालेल्या संपत पवार यांनी कंबर कसली. स्वताच्या मुलाला बरोबर घेऊन आखाड्याची स्वच्छता केली आखाड्यात उगवलेली झाडे झुडपे काढून टाकली आखाड्यात रोटर मारून माती भुसभुशीत केली. मैदान होणार नसल्याने हे पैलवान कशासाठी धडपड करताहेत याचे कोडे ग्रामस्थांना पडले होते. मात्र मंगळवारी संपत पवार यांनी चार जेष्ठांना बरोबर घेऊन अखेर मैदान घडवून आणलेच. प्रथेप्रमाणे पैलवानांचे आराध्य दैवत असलेल्या हनुमानच्या फोटोची आखाड्यात पूजा करण्यात आली. नारळ फोडून उद्घाटन झाले आणि सारंग पवार विरुद्ध अर्णव गायकवाड अशी कुस्तीची सलामी झडली.
शड्डू ठोकून दोन्ही मल्लांनी एकमेकांना आव्हान दिले. मैदानातील ती पहिली आणि शेवटची कुस्ती असली तरी ती रंगदार झाली. फक्त ती बरोबरीत सोडवण्यात आली. उपस्थित लोकांनी रोख बक्षीस देऊन मल्लांचे कौतुक केले. नेहमी हजारोंच्या कुस्तीशौकिनांच्या उपस्थितीने फुलून जाणारे कुस्ती मैदान सुनेसुने होते. कडाडणारी रणहालगी आणि रसाळ समालोचन नसल्याने सर्वत्र शांतता होती. यंदा गर्दीचा महापूर आणि पैलवानांची मांदियाळी नसली तरी देखील मोजक्या लोकांच्या उपस्थितीत सोशल डिस्टनसिंगचे पालन करुन बलवडीचे कुस्ती मैदान पार पडले. दरवर्षी प्रथम क्रमांकाच्या कुस्तीला चांदीची गदा देणारे सिध्देश्वर गायकवाड यांनी यंदा हा गदेचा खर्च पैलवानांना खुराकासाठी देणार असल्याचे सांगितले.
कोरोनामुळे मैदान होणार नाही. 70 वर्षाची परंपरा खंडित होणार हा विचार मनाला पटत नव्हता. त्यामुळे शासनाच्या आदेशाचे पालन करून पारंपरिक पद्धतीने पूजन करून मैदानात कुस्ती लावली जोडण्यात आली. शड्डू घुमल्याने तरुणांच्या मनात कुस्ती परंपरा आणि संस्कृतीची जपणूक करण्याची जिद्द निर्माण होईल. परंपरा अबाधित राहिल्याने मोठे समाधान मिळाले आहे. -संपत पवार कुस्तीप्रेमी (बलवडीच्या कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाची कुस्ती लावताना प्रेमी )
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









