दिल्लीत दि. 20 रोजी होणार सन्मान, मुख्याधिकारी अभिजीत बापट जाणार पुरस्कार स्वीकारण्यासाठी
प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहरात वेळेवर कचरा उचलण्यासाठी पालिकेने योग्य नियोजन केले आहे. हे केंद्राच्या पथकाने पाहणी केल्यानंतर निदर्शनास आले. त्यामुळे कचरामुक्त शहर म्हणून सातारा शहरास पुरस्कार जाहीर झाला असून त्यासाठी दिल्ली येथे सन्मान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मुख्याधिकारी अभिजित बापट हे जाणार आहेत. ‘कचरामुक्त शहर’चा पुरस्कार जाहीर झाल्याने सातारा पालिकेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
सातारा पालिकेचे विद्यमान पदाधिकारी नगराध्यक्षा माधवी कदम, उपाध्यक्ष मनोज शेंडे या दोघांच्याबरोबरच मुख्याधिकारी अभिजीत बापट हे शहर स्वच्छ कसे राहिल यासाठी वारंवार आरोग्य विभागास सूचना देत असतात. नागरिकांच्या ज्या ज्या मागण्या येतात त्यानुसार लगेच कार्यवाही केली जाते. हद्दवाढ झालेल्या भागाकडे प्राधान्यांने लक्ष दिले जात आहे. विशेष करुन मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी शहराचे नाव देशपातळीवर कसे येईल यादृष्टीने सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यांच्या प्रयत्नामुळेच आणि नियोजनामुळे केंद्रीय सर्व्हेक्षण पथकास सातारा शहर हे कचरामुक्त शहर आढळून आले. त्यामुळे शहराला पुरस्कार जाहीर झाला असून दि. 20 रोजी दिल्ली येथील विज्ञान भवनात होणाऱया पुरस्कार वितरण सोहळय़ास हजर राहण्याचे निमंत्रण दि. 10 रोजी मिळाले असून सातारा पालिकेचा तेथे सन्मान होणार आहे. या सोहळय़ाला सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट हे जाणार असून पुरस्काराचा स्वीकारणार करणार असल्याचे समजते.
सातारा शहराचा सन्मान
सातारा शहरात सातारा विकास आघाडीच्या माध्यमातून प्रशासनाने शहर स्वच्छतेच्या अनुषंगाने कोरोना काळात जे नियोजन केले. व हद्दवाढ झाल्यानंतरही हद्दवाढ झालेल्या भागातील स्वच्छतेला प्राधान्य दिले. शहरामध्ये स्वच्छता राबवण्यात आली. कचरा कुठे उघडय़ावर पडू नये याची दक्षता घेण्यात येते. गारबेज सिटी म्हणून सातारा शहरास जो पुरस्कार जाहीर झाला आहे तो सातारा शहराचा सन्मान आहे. सर्व सातारकरांचा सन्मान आहे.
माधवी कदम, नगराध्यक्षा








