नऊ वर्षीय इरमला ग्रासले होते असाध्य रोगाने, तातडीने उपचार न केल्यास कायमचे अपंगत्व येण्याची होती शक्यता
प्रतिनिधी/वाठार किरोली
राज्यमंत्री बच्चू कडू यांची प्रहार संघटना अनेक समाज उपयोगी काम करीत असते. याचा प्रत्यय आर्वी ता. कोरेगाव येथील अकबर तांबोळी यांना आला. तांबोळी यांच्या नऊ वर्षीय इरम या मुलीला असाध्य रोगाने ग्रासले होते. इरमवर तातडीने उपचार न केल्यास कायमचे अपंगत्व येण्याची शक्यता होती. शस्त्रक्रियेसाठी सहा ते सात लाख रुपयांची आवश्यकता होती.पैशासाठी हतबल झालेल्या तांबोळी यांची माहिती प्रहार संघटनेला मिळाली आणि नामदार बच्चू कडू यांनी स्वतः लक्ष घालून मुलीची शस्त्रक्रिया करून घेतली.
आर्वी येथे राहणारे अकबर तांबोळी एका अपघातात अपंगत्व आले होते. ते फोटोग्राफीचा व्यवसाय करून कुटुंबाची गुजराण करीत होते. यातच त्यांची मुलगी इरमला चालताना त्रास होऊ लागला. दवाखान्यात तपासणी केली असता मुलीच्या पायावर तातडीने शस्त्रक्रिया न केल्यास कायमचे अपंगत्व येण्याची शक्यता डॉक्टरांनी सांगितली. यावेळी अकबर तांबोळी यांच्या मदतीसाठी कोरेगाव तालुका फोटोग्राफर असोसिएशन धावून आली. व्हाट्सअप ग्रुप वर आर्थिक मदत देण्याचे आवाहन करण्यात आले. यामधून काही मदत गोळा झाली परंतु त्यातून त्यातून शस्त्रक्रियेचा खर्च होत नव्हता. ही पोस्ट नाशिकचे फोटोग्राफर संदीप आहेर यांनी पाहिली. हि माहीती आहेर यांनी प्रहार संघटनेचे रूग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष प्रताप तायडे यांच्यापर्यंत पोहोचवली.प्रताप तायडे यांनी नामदार बच्चू कडू यांना ही माहिती दिली. त्यांनी तातडीने तांबोळी यांच्याशी संपर्क साधून मुंबईमध्ये संत गाडगेबाबा आश्रमातील त्यांच्या ऑफिसमध्ये सहा दिवस राहण्याची व्यवस्था केली. तसेच कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पीटल अंधेरी येथे मुलीला दाखल करण्यास सांगितले. हॉस्पिटलमधील डॉ. अभिजित पवार त्यांच्या सहकाऱ्यांनी सलग दहा तास यशस्वी शस्त्रक्रिया केली.
यासाठी लागणारा संपूर्ण खर्च प्रताप तायडे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून व योगेश पाटील यांनी रिलायन्स ट्रस्टकडून उपलब्ध करून दिला. यामुळे अकबर यांची मुलगी इरम स्वतःच्या पायावर उभी राहिली. या सर्व घडामोडीत अकबर यांना मित्रांचे पाठबळ व मेहुणे जमीर तांबोळी, सलीम तांबोळी यांनी मानसिक आधार तिला.
नामदार बच्चू कडू यांची मदत लाख मोलाची – अकबर तांबोळी
मुलीच्या उपचारासाठी प्रहार संघटना व नामदार बच्चू कडू यांनी केलेली मदत आयुष्यभरासाठी विसरता येणार नाही. नामदार बच्चू कडू यांनी कोरोनाच्या साथीत एवढे काम असताना सुद्धा तीन वेळा फोन करून मुलगी इरम हिच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यांच्या रूपात देवच मदतीला धावला अशी प्रतिक्रिया अकबर तांबोळी यांनी दिली.
Previous Articleपोलीस प्रशासनात म्हापसा, फोंडा नवे जिल्हे
Next Article साताऱयात एका दिवशी दोन दुचाकी लंपास









