प्रतिनिधी / सातारा :
सातारा पालिकेच्या येवू घातलेल्या निवडणूकीत राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेची महाविकास आघाडी होईल, की नाही हे आपण सांगू शकत नाही. वरीष्ठ पातळीवर ठरेल तेव्हा ठरेल, परंतु सर्वच 48 जागा लढवण्याची तयारी शिवसेनेकडून करु. सातारा शहरातील 48 जागा लढवून शिवसेना पालिकेवर भगवा फडकवणारच, अशी सिंहगर्जना राजेंच्या साताऱ्यात राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली.
शिवसेनेच्या आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. मंत्री सामंत म्हणाले, माझ्या मंत्रीपदाचा उपयोग सातारा शहरातील शिवसेना वाढवण्यासाठी निश्चित करेन. पालिकेच्या 48 जागा आहेत. लोकसभेला, विधानसभेला दहशत माजवण्यावारे सगळे तिकडे आहेत. त्यांच्यापेक्षा आपण विकासाची रेघ मोठी मारली तर आपल्या बाजूने जनतेचा कौल होईल. मुख्यमंत्र्यांनी चांगलं काम केले आहे. महाराष्ट्रात केवळ अनेकांच्या हृदयातच मुख्यमंत्री नाहीत तर त्यांच्या नावाचे पॅनेलही निवडून आलेले आहे. एवढी चांगली प्रतिमा राज्यात तयार झाली आहे. विधानसभा निहाय बैठका लावा मी येणार आहे. पक्षासाठी चोवीस तास उपलब्ध असलेले संपर्कप्रमुख तुम्हाला लाभले आहेत. धनुष्यबाणाची निशाणी सातारकर स्वीकारतील. त्याकरता केवळ आरंभ शूळ असुन चालणार नाही. वार्ड तेथे शाखा सुरु करा. घरोघरी शिवसैनिक तयार झाला पाहिजे. एक महिन्यात मी पुन्हा येईन. तेव्हा मला जास्तीत जास्त शाखा सुरु झालेले फलक दिसले पाहिजेत. सातारा नगरपालिका ही निवडणूक कठीण नाही, नुसता संकल्प करून नाही तर तो पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. सातारा पालिका हा शिवसेनेचा बालेकिल्ला करु, असेही त्यांनी सांगितले.